Chakan : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीची लढाई रस्त्यावर

विलास लांडे यांचे सडेतोड प्रश्न; खासदार आढळराव यांची सावध उत्तरे

एमपीसी न्यूज- चाकण परिसरातील महामार्गावरील दर्शनी भागात प्रत्येक चौकात मोठ-मोठे फलक सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असलेले हे फलक राष्ट्रवादी कडून शिरूर लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या माजी आमदार विलास लांडे आणि सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आहेत. राष्ट्रवादीकडून विविध प्रलंबित प्रश्न विचारणारे फलक मागील पंधरावड्यापूर्वी लावून खा. आढळराव यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला; तर शिवसेनेकडूनही त्याच प्रश्नांची उत्तरे देणारे फलक नुकतेच लावले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये फलक युद्ध रंगल्याची जोरदार चर्चा शिरूर लोकसभा मतदार संघात आहे.

आता लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे संकेत हे सवाल-जबाबांचे फलक पाहून मिळत आहे. सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी आगामी काळात शिरूर लोकसभा मतदार संघात होऊ घातलेली लढाई आताच फलकांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सलग तीन वेळा राष्ट्रवादीला अस्मान दाखवून निवडून आलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव यांना अनेक प्रश्न विचारणारे फलक लावून राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . महामार्गांवर ठिकठिकाणी असे फलक पंधरा दिवसांपासून झळकत आहेत. मागील काही दिवस अनेक इच्छुकांकडून टोकाच्या टीका-टिप्पण्या होत असताना खासदार आढळराव यांनी विरोधी उमेदवाराच्या बाबत निश्चितता नसल्याने सर्वाना एकाचवेळी अंगावर घेण्याएवजी सूचक मौन पाळले होते. मात्र आता खासदार आढळराव यांनीही सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणारे फलक चाकणसह मतदार संघात अनेक ठिकाणी लावले आहेत.

राष्ट्रवादीकडून पुणे नाशिक लोहमार्ग, महामार्ग, विकास आदी प्रश्न उपस्थित करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुका वातावरण निर्मितीवर लढविल्या जातात असे बोलले जाते. त्याचाच भाग म्हणून वातावरण निर्मिती करुन प्रलंबित प्रश्नावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिरूर अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे दाखविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. खासदार आढळराव यांनी संबंधित सर्व प्रश्नांना उत्तरे देणारे फलक लागल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, या फलकांवरुन सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फलक युद्ध रंगले आहे. या दोन्ही नेत्यांच्या लागलेल्या फलकांची जोरदार चर्चा सामान्य नागरिक आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.