Chakan : पक्ष्यांसाठी राखून ठेवले अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक

एमपीसी न्यूज – घरात प्राणी, पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेकजण आपण पाहतो. पण सद्यस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवा-याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर चाकण, खराबवाडीतील प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा शिवराम कड या शेतक-याने अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षी मायेचे पक्षी प्रेमींतून कौतुक होत आहे.

ज्ञानोबा कड यांची खराबवाडी (चाकण) परिसरात चार एकर शेती आहे. यातील अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक कड यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत.

कड यांनी शेजारीच असलेल्या नारळाच्या झाडांना मडकी बांधली आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे. चारा, पाणी मुबलक मिळत असल्याने पक्ष्यांचे थवेच्या थवे या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्वारीच्या या क्षेत्रातून कड यांना 15 ते 17 क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले असते. मात्र, उत्पन्नाचा विचार न करता त्यांनी ज्वारीचे उभे पीक पक्ष्यांसाठी उपलब्ध करून पक्ष्यांविषयी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाचे चाकण परिसरात कौतुक होत आहे.

याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा कड म्हणाले, “आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. उन्हात पक्ष्यांना चारा पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय घेतला. ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.