Chakan : पैशांच्या वादातून माय-लेकाला मारहाण केल्याप्रकरणी खेडच्या माजी सभापतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीन विक्रीच्या व्यवहारातून सास-यांना मिळालेल्या पैशांचा हिस्सा मागणा-या जावेला मारहाण केल्याप्रकरणी खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचे पती मोई गावचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांच्यासह अन्य दोघांवर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कल्पना पाटीलबुवा गवारी, पाटीलबुवा ज्ञानोबा गवारी, गुरुदास पाटीलबुवा गवारी आणि रुपाली साहेबराव गवारी (सर्व रा. मोई, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कल्पना यांच्या जाऊबाई आहेत. कल्पना यांचे सासरे ज्ञानोबा यांना त्यांच्या पूर्वजांची जमीन विक्रीतून 1 कोटी 45 लाख रुपये हिस्सा आला. ज्ञानोबा यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. त्यामुळे आलेल्या पैशांच्या सामान वाटण्या करण्याचे गवारी कुटुंबियांचे नियोजन होते.

दरम्यान, माजी सरपंच पाटीलबुवा यांनी फिर्यादी महिलेला चार लाख रुपये दिले. उर्वरित पैशांची वाटणी सर्वांमध्ये समान करण्यात येणार होती.

  • फिर्यादी महिलेचा मुलगा केतन बाळासाहेब गवारी (वय 21) याने शुक्रवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास पाटीलबुवा यांना जमिनीच्या हिस्श्यातील 46 लाख रुपये मागितले. यावरून त्यांच्यात भांडण झाले. पाटीलबुवा यांनी फिर्यादी महिलेला आणि मुलाला लोखंडी रॉडने मारहाण केली.

तर रुपाली आणि कल्पना यांनी हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संजय घाडगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.