Chakan: राजकीय वैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार, गावठी कट्टा लॉक झाल्याने जीव वाचला

Chakan: Firing on police patil of varchi bhamburwadi treatment going on एक गोळी वाळुंज यांच्या हाताच्या मनगटाला लागली असून हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

एमपीसी न्यूज- राजगुरूनगर (ता.खेड,जि.पुणे) परिसरात झालेल्या गोळीबारात एक पोलीस पाटील थोडक्यात बचावला. ही घटना रविवारी दुपारी (दि.28) वरची भांबुरवाडी येथे घडली. जखमी पोलीस पाटलाचे नाव सचिन भिवसेन वाळुंज (वय 35) असे आहे. वाळुंज हे वरची भांबुरवाडी गावचे पोलीस पाटील आहेत. एक फायरिंग झाल्यावर गावट्टी कट्टा लॉक झाल्याने वाळुंज यांचा जीव वाचला. एक गोळी वाळुंज यांच्या हाताच्या मनगटाला लागली असून हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पाटील सचिन वाळुंज यांना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ठेकेदार संजय कौटकर यांचा फोन आला की, “पाण्याची टाकी बांधायची जागा दाखविण्यासाठी तुम्ही इकडे या” दरम्यान सचिन वांळुज हे त्यांच्या चारचाकी गाडीत गेले होते.

तेथे कौटकर यांच्या सोबत आलेले मित्र व वाळुंज यांच्यात चर्चा सुरु होती. सौरभ अनिल ढोरे, विपुल भिमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे हे सर्व (रा. वरची भांबुरवाडी ता खेड) त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेले होते.

अचानक फटाक्यासारखा मोठा आवाज आला. म्हणून वाळुंज यांनी आपल्या हाताला हात लावला असता त्यातून रक्त वाहत होते. समोर पाहिले असता सौरभ ढोरे यांने वाळुंज यांच्यावर गावठी कट्टा रोखला होता. मात्र गावठी कट्टा लॉक झाल्याने त्यातून पुन्हा फायरिंग झाली नाही.

दरम्यान वाळुंज यांनी तेथून पळ काढला. त्यांच्या पाठीमागे सौरभ ढोरे, विपुल थिगळे व अतुल भांबुरे यांनी दगड मारले. सचिन वाळुंज हे थेट त्यांच्या चारचाकीमध्ये बसून राजगुरुनगर येथील एका खासगी रुग्णालयात आले.

या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील पोलीस पाटील व मित्रपरिवाराने रुणालयाच्या आवारात गर्दी केली होती. वाळुंज यांच्यावर राजकीय वादातून गोळीबार झाला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. वाळुंज यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गोळी लागली असून हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपी व मुख्य सूत्रधार यांचा शोध पोलीस घेत आहेत. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून खेड तालुक्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.