Chakan : नुकसान भरपाई न दिल्याने कार चालकावर गोळीबार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – दोन कारची धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र एका कारचालकाने त्याच्या कारचे झालेले नुकसान भरून न दिल्याच्या कारणावरून समोरच्या कारमधील व्यक्तीवर गोळीबार केला. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आंबेठाण गावात शुक्रवारी (दि. 21) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय 33, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश उर्फ जग्गुभाई नवनाथ मांडेकर (वय 28, रा. आंबेठाण, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताराम शुक्रवारी रात्री त्यांच्या मावस भावाच्या मित्राची कार (एम एच 14 / एफ एन 9159) घेऊन जात होते. आंबेठाण गावाच्या हद्दीत त्यांच्या कारचा आरोपी निलेश याच्या कारला (एम एच 14 / 6030) धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले. मात्र निलेश याने शांताराम यांच्याकडे कारची नुकसान भरपाई मागितली. शांताराम यांनी आरोपी निलेश याला नुकसान भरपाई दिली नाही. यावरून निलेश याने त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुल मधून शांताराम यांच्यावर गोळी झाडली. दरम्यान शांताराम यांच्यासोबत त्यांचा चुलत भाऊ गणेश चव्हाण होता. निलेश गोळी झाडत असताना गणेश मोठ्याने ओरडला आणि त्याने निलेशच्या हाताला धक्का दिला. यामुळे हवेत गोळीबार झाला. त्यानंतर निलेश याने शांताराम यांना मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी आरोपी निलेश याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.