Chakan: चाकणमध्ये कोरोनाचा पहिला बळी, खेड तालुक्यात स्थिती चिंताजनक

Chakan: First victim of corona in Chakan, situation in Khed taluka critical कोरोना संसर्ग झालेल्या या आडत्यावर सुरुवातीला चाकण येथील एका रूग्णालयात उपचार सुरु होते.

एमपीसी न्यूज- कडाचीवाडी येथील कोरोना संसर्ग झालेल्या आडत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब रविवारी (दि.28) रात्री साडेनऊच्या सुमारास समोर आली आहे. चाकण परिसरातील हा कोरोनाचा पहिलाच बळी आहे. संबंधित आडत्याच्या मृत्यूने चाकण आणि कडाचीवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या या आडत्यावर सुरुवातीला चाकण येथील एका रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर संबंधित रुग्णास पुण्यातील एका बड्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे.

या संपूर्ण परिसरासाठी ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे. संबंधित कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या आडत्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रशासनाने प्रशासकीय स्तरावरून सूचना दिल्याची माहिती प्राप्त होत आहे.

कडाचीवाडीशी संबधित रुग्ण आणि भोसे येथील राजयोग मंगल कार्यालयात झालेल्या साखरपुडा आणि त्यातून अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याने चाकण पालिकेने पोलीस आणि महसूल प्रशासनाला संबंधित राजयोग मंगल कार्यालयाच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे.

या शिवाय तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा क्षणाक्षणाला वाढत आहे. खेड तालुक्यातील सोळू येथील पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील, सात जणांना कोरोना संसर्ग झाल्याची बाब रविवारी रात्री आठ वाजता निष्पन्न झाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

त्यामुळे खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी एकाच दिवसात 13 ने वाढला आहे. खेड तालुक्यातील शनिवारी घेण्यात आलेले 49 आणि रविवारी घेण्यात आलेल्या 11 जणांचे असे एकूण 60 जणांचे कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

खेड तालुक्यात रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण कोरोना रुग्ण संख्या 91 झाली आहे. यातील कडाचीवाडीमधील आज एकाच्या मृत्यूसह एकूण तिघांचा मृत्यू झाला असून 51 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 37 सक्रिय रुग्ण तालुक्यात आहेत.

रविवारी रात्री नऊ पर्यंत तालुक्यात दिवसभरात नव्याने आढळलेले एकूण रुग्ण 13 असून येलवाडी 1, चाकण 2, सोळु 9, सांडभोरवाडी (राजगुरुनगर) 1 अशी एकूण स्थिती असल्याचे खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like