Chakan : देशी-विदेशी मद्याच्या साडेपाच हजार बाटल्या नष्ट

चाकण पोलीस व उत्पादन शुल्कची कारवाई

एमपीसी न्यूज- चाकण पोलिसांनी मागील दोन वर्षात विविध छाप्यांमध्ये जप्त केलेली तब्बल साडेसात लाखांचे देशीविदेशी मद्य मंगळवारी (दि. 21) नष्ट करण्यात आले. चाकणपासून जवळच असलेल्या वाकी बुद्रुक ( ता. खेड) येथे निर्जन जागेत मोठा खड्डा करून त्यात या मद्याच्या बाटल्या फोडण्यात आल्या. चाकण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत छापे घातलेले सन 2017-18 सालातील विविध गुन्ह्यातील 7 लाख 61 हजार 178 रुपये किमतीच्या 5 हजार 521 देशी विदेशी मद्याच्या बाटल्या न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आल्या. वाकी बुद्रुक ( ता. खेड) येथील गावठाण जमीन गट नंबर 1 येथे भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या समोरील पडक्या जमिनीत जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठा खड्डा घेण्यात आला. त्यामध्ये या सर्व देशी विदेशी मद्याच्या बाटल्या ओतून नष्ट करण्यात आल्या. यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एन.जी.होलमुखे, ए.बी.राऊत यांच्यासह चाकण पोलीसठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

बाटलीच्या काचेमुळे पोलीस निरीक्षक जखमी

मद्याच्या बाटल्या मोठ्या खड्ड्यात फोडण्यात आल्या. सर्व दारूच्या बाटल्या खड्ड्यात टाकण्यात आल्या. न फुटलेल्या बाटल्या जेसीबी यंत्राच्या साह्याने दाबून फोडण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिले. खड्ड्याच्या जवळ उभे राहून पाहणी करत असताना त्यातील एक बाटलीची फुटलेली काच पवार यांच्या डोळ्याच्या वरील भुवईजवळ शिरली. त्यांना तत्काळ वाकीतीलच एका दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. उपचारानंतर पवार यांनी पुन्हा घटनास्थळी येऊन कारवाई पूर्ण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.