Chakan : स्कॉर्पिओच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – चुलता पुतण्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात समोरच्या बाजूने आलेल्या स्कॉर्पिओ कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पाच वर्षीय पुतण्याचा मृत्यू झाला. तर चुलता गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 13) रात्री सव्वादहाच्या सुमारास खेड तालुक्यातील भोसे गावाजवळ घडला.

सोहम अंकुश लंबे (वय 5) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर, अभिमन्यू मदन लंबे असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी मंगल अंकुश लंबे (वय 29, रा. पिंपळेवस्ती, भोसे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, स्कॉर्पिओ कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमन्यू बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास त्यांचा पुतण्या सोहम याला त्याच्या घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते चाकण-शिक्रापूर रोडवरील हॉटेल गावठीच्या समोर आले असता विरुद्ध दिशेने आलेल्या स्कॉर्पिओ कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिल्याने अभिमन्यू यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडली.

अभिमन्यू यांना गंभीर दुखापत झाली. तर पाच वर्षीय सोहमचा यात मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता कारचालक पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.