Chakan : व्यवसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या; चाकण येथील थरार, रोख रकमेसह मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – तीस वर्षीय तरुण व्यवसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याला जबरदस्तीने डांबून ठेवत त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या चाकण येथील चार सराईत गुन्हेगारांना शनिवारी (दि. 11 जानेवारी) येथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या या सर्व सराईत गुन्हेगारांकडून येथील पोलिसांनी रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

तापस रंजन गिरी (वय – ३० वर्षे, सध्या रा.बालाजीनगर, नर्मदा पार्क ,मेदनकरवाडी, मूळ रा.गडसाई, बालीअपाल, ता. जलेश्वर, जि. बाळासोर, ओरिसा.) या पाणी व कोल्ड्रिंक्स सप्लायर करणाऱ्या व्यवसायिकाने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गिरी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी चेतन शिवाजी राऊत ( वय.- २६ वर्षे, रा. .बलुते आळी, चाकण.), दिशांत अशोक केळकर ( वय – २२ वर्षे, रा.दत्त मंदिरा समोर, चाकण.), सौरभ प्रशांत इंगळे ( वय – १९ वर्षे, रा. झित्राईमळा, चाकण.), गणेश प्रकाश नाईक ( वय – २० वर्षे, रा. भुजबळ आळी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या चार सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार चेतन शिवाजी राऊत व गणेश प्रकाश नाईक या दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात यापूर्वी घर फोडीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांना गजाआड करण्यात आले होते.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तापस गिरी यांचा पाणी व कोल्ड्रिंक्स सप्लायरचा व्यवसाय असून, मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील बालाजीनगर येथे राहून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार ( दि.६ जानेवारी ) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीतील चक्रेश्वर रस्त्यावरील चाकण नगरपरिषदेच्या शौचालयाजवळ गिरी हे लघुशंका करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी संगनमताने वरील चारजण दोन मोटरसायकलवर तेथे आले, त्यांनी मागचा पुढचा विचार न करता गिरी यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आवाज करू नकोस, अशी धमकी दिली, गिरी यांच्या डोळ्याला पट्टी बांधून, त्यांना रातोरात गाडीवर बसवुन एका पोल्ट्री फार्म जवळ नेले. त्यांच्या खिशातील रोख १५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन, तुझ्या कामगाराकडे आणखी किती पैसे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून आणखीन पैसे मागवून घे, अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी ( दि. 7 जानेवारी) रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान गिरी यांना त्यांनी अज्ञात स्थळी डांबून ठेवले होते.

चाकण पोलिसांनी या धक्कादायक घटने प्रकरणी गिरी यांच्या फिर्यादी वरून चेतन राऊत, दिशांत केळकर, सौरभ इंगळे व गणेश नाईक (सर्व रा. चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या चारही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या या गुन्हेगारांकडून येथील पोलिसांनी रोख रक्कम 11 हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुरेश हिंगे, पोलीस नाईक संजय जरे, हनुमंत कांबळे, संदीप सोनवणे, वीरसेन गायकवाड, अनिल गोरड, निखिल वरपे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदीप राळे आदींनी या धाडसी कारवाईत भाग घेतला. चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like