Chakan : गणेश विसर्जन: कुरुळी, निघोजे, भांबोली परिसरात चौघे बुडाले; एकजण अद्यापही बेपत्ता

एमपीसी न्यूज – संपूर्ण चाकण पंचक्रोशीत गुरुवारी (दि.१२) गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना कुरुळी, निघोजे, भांबोली या ठिकाणी विसर्जनसाठी गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भांबोली येथील एकाच तलावात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी पाण्यात बुडालेल्या सर्वांचे मृतदेह शुक्रवारी (दि. १३) मिळून आले. तर, कुरुळी येथे बुडालेल्याचा शोध एनडीआरएफचे जवान अद्यापही घेत आहेत.

ज्ञानेश्वर रघुनाथ पारधी (वय २१, सध्या रा. कुरुळी, ता. खेड , मूळ रा. धानोरा, जि. बुलढाणा) असे निघोजे ( ता. खेड) येथील डोंगरवस्ती भागात तलावात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, बाळू तुकाराम राउत ( वय ४५, रा. भांबोली, ता. खेड) आणि कैलास संभाजी लांडगे ( वय १९, सध्या रा. भांबोली, ता. खेड, मूळ रा. भोलसा, जि. नांदेड) असे भांबोली येथील तलावात बुडालेल्या दोघांचे नाव आहे. कुरुळी येथे बुडालेल्या व्यक्तीचा अद्याप काहीही तपास लागलेला नसून पाण्यात बेपत्ता झालेल्या संबंधिताचे नावही अद्याप निष्पन्न झालेले असल्याचे महाळुंगे पोलिसांनी सांगितले आहे.

ज्ञानेश्वर पारधी हा युवक निघोजे (ता. खेड) येथील डोंगरवस्ती भागात तलावात गुरुवारी सायंकाळी विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

तर, बाळू राऊत आणि कैलास लांडगे हे दोघे भांबोली येथील तलावात गुरुवारी सायंकाळी सहाचे सुमारास गणेश विसर्जनसाठी गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले.

कुरुळी (ता. खेड) येथे पाण्यात बेपत्ता झालेल्या इसमाचा एनडीआरएफचे जवान शोध घेत आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नसून शोध सुरु आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.