Chakan : खराबवाडीत नाल्यात एलपीजी गॅस टँकर उलटला

व्हॉल्व्ह शाबूत राहिल्याने मोठी दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज- चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला एचपी कंपनीचा टँकर सोमवारी (दि. 10) दुपारी बाराच्या सुमारास रस्त्यालगतच्या खोल नाल्यात उलटल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी (ता. खेड) येथे महादेवी मंदिराच्या समोर घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त टँकरखाली एक महिला अडकून पडली होती. मात्र शिताफीने तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने गॅस गळती न झाल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या बाबतचे वृत्त असे की, एच पी कंपनीचा एलपीजी गॅस टँकर (एम एच 04 जे के 4149) खराबवाडी ( ता. खेड) गावच्या हद्दीतील महादेवी मंदिराच्या समोरील भागात समोरील वाहनाने हुलकावणी दिल्यानंतर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाकडून टँकर रस्त्यालगतच्या खोल नाल्यात उलटला. टँकर उलटल्यामुळे मोठा आवाज झाल्याने या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गॅस टँकर खोल नाल्यात पडल्याचे व त्याखाली एक महिला अडकल्याचे निदर्शनास आले.

स्थानिकांनी अत्यंत शिताफीने त्या महिलेला बाहेर काढून रुग्णालयात पाठविल्याचे स्थानिक कार्यकर्ते विशाल खराबी यांनी सांगितले. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक चाकण येथील तळेगाव चौकात आणि खालुंब्रे (ता. खेड) येथील मेरीएट चौकातून वळविण्यात आली. एचपी कंपनीच्या अधिका-यांना घटनास्थळी पोहचून पोलिसांच्या उपस्थितीत टँकरची तपासणी करून टँकरमधून गॅस गळती होत नसल्याची खात्री केली.

त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि एचपीच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाचे दोन बंब पाचारण करून चार मोठ्या क्रेनच्या साह्याने नाल्यात पडलेला अपघातग्रस्त टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सायंकाळी साडेपाचनंतर कंपन्यांतून सुटलेल्या कामगारांची वर्दळ या भागात सुरु झाली. त्यांना रोखताना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

नशीब बलवत्तर म्हणून ….

रस्ता ओलांडून बँकेत निघालेली महिला रुपा रमाकांत मुलघे (वय 32, रा. खराबवाडी) अपघातग्रस्त टँकरसह फरपटत नाल्यात टँकर खाली अडकल्या. त्यांचा हात टँकरच्या खालून बाहेर आलेला स्थानिकांनी पहिल्याने अत्यंत शिताफीने त्यांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय या टँकरमध्ये एचपी कंपनीचा सुमारे 17 टन गॅस होता मात्र टॅंकरचे मुख्य व्हॉल्व्ह शाबूत राहिल्यानेच गॅस गळती झाली नाही व मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त टँकर खाली आणखी कुणी अडकले आहे काय ? याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र रात्री सातचे सुमारास टँकर क्रेनच्या साह्याने उचलल्यानंतर त्याखाली आणखी कुणीही अडकले नसल्याची खात्री झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.