Chakan Crime News : चाकण, हिंजवडी, तळेगाव, भोसरीत चो-यांचे सत्र थांबेना; दागिने, रोकड, पत्र्यांसह चंदनाचे झाड चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण आणि हिंजवडी येथे जबरी चोरीचे दोन गुन्हे घडले, तर भोसरीत एक घरफोडी झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरले तर हिंजवडी परिसरातून पत्रे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 25) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

चाकण चोरी प्रकरण –

चाकण पोलीस ठाण्यात अशोक जानू आखाडे (वय 39, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. बुधवारी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास निघोजे येथे कंपनीत जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले. फिर्यादी यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून वार केले. त्यानंतर फिर्यादी यांचे पाकीट चोरून नेले.

हिंजवडीत मोबाईल आणि पत्र्यांची चोरी –

हिंजवडी पोलीस ठाण्यात अभिषेक संतोष वैराट (वय 24, रा. भूमकर चौक, वाकड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत मोहन कळसे (वय 25), भारत हरिबा दुधाळ (वय 25, दोघे रा. हिंजवडी) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते सोमवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजता रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून शाहरुख भाईला फोन का केला नाही, असे म्हणून मारहाण करून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी अनिकेत आणि भारत यांना अटक केली आहे.

पांडुरंग दत्तात्रय सुतार (वय 58, रा. पाषाण) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे कस्टम केअर फर्निचर दुकान आहे. दुकानाच्या शेजारी मोकळ्या जागेत ठेवलेले 57 हजार 600 रुपयांचे 232 लोखंडी पत्रे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी घरफोडी प्रकरण –

भोसरी पोलीस ठाण्यात दत्तात्रय लक्ष्मण पवार (वय 42, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली. पवार यांच्या घराचा कडी कोयंडा व लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी 31 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे येथे चक्क चोरले चंदनाचे झाड –

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अर्जुन बबन भरडे (वय 38, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने शिरगाव येथील मंजू मेडोज स्टड फार्म या फार्म हाऊस मधून 45 हजार रुपयांचे चंदनाचे झाड कापून चोरून नेले. हा प्रकार बुधवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.