Chakan : संग्रामदुर्गाच्या उत्खननात सापडताहेत ऐतिहासिक वस्तू

तोफेचे गोळे, जुने खिळे, दगडी वस्तू आणि अवशेष आढळले

एमपीसी न्यूज – भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली चाकण (ता. खेड, जि पुणे) येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनास सुरुवात झाली आहे. या उत्खननात संग्राम दुर्गावरील दुर्मिळ ऐतिहासिक शिवकालीन वस्तू हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. युद्धातील लहान – मोठे सुमारे १५ तोफेचे गोळे, अनेक जुने खिळे, लोखंडी वस्तू, प्राण्यांचे अवशेष यात सापडले आहेत.

पुणे जिल्ह्यातील चाकणचा संग्रामदुर्ग भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आणि मुगल सेनापती शाहिस्तेखान यांच्यामधे जून १६६० मध्ये झालेल्या संघर्षामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या साहस पर्वाच्या इतिहासात संग्रामदुर्गाची वेगळी ओळख आहे. पूर्वी सारखाच संग्रामदुर्ग किल्ला हा दिसावा, यासाठी शासनाने किल्ला संवर्धन प्रकल्प हाती घेतला असल्यामुळे किल्ला संवर्धनाचे काम सुरू झाले आहे.

  • किल्ल्यावर काही भागात उत्खनन सुरू असून या भागात पूर्वी काय होते आणि जुन्या वस्तू मिळतात का? याचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खनन काम सुरू आहे. चार ते पाच फूट खोदल्यानंतर आता अनेक वस्तू बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या किल्ल्यातील मध्यभागी दोन ठिकाणांचे उत्खनन करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थी आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या उत्खननात शिवकालीन शस्त्रे, अस्त्रे यांचे अवशेष तसेच नाणी आणि काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू व वास्तूंचे अवशेष सापडू लागले आहेत.

या उत्खननामध्ये आढळून आलेल्या वस्तूंमुळे आणि वस्तूंच्या आकारामुळे त्याचा उपयोग नेमका कशासाठी झाला, हे समजू शकण्यास मदत होईल, आतापर्यंत येथे पुरातन खिळे, सुमारे पंधरा तोफेचे गोळे, प्राण्यांचे अत्यंत जुने अवशेष, लोखंडी वस्तू मिळून आल्याचे पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आणि डेक्कन कॉलेजचे धनंजय खंदारे व मैत्री भोसेकर यांनी सांगितले.

  • चाकणच्या या इतिहासकालीन किल्ल्यावर पुरातत्वीय संशोधन गरजेचे होते, कारण किल्ल्यावर सापडणारा प्रत्येक ठेवा हा महत्त्वाचा असून त्यावेळच्या पुरातन वस्तूंसह तत्कालीन जीवनशैली समजून घेण्यासाठीही प्रत्येक वस्तूला विशेष महत्व आहे. दरम्यान, पुढील पंधरा दिवस हे उत्खनन सुरु राहणार असून आणखी तोफेचे गोळे, बंदुकीची काडतुसे, जुने खिळे, नाणी अशा शिवकालीन पुरातन वस्तू उत्खननात सापडण्याची शक्यता आहे.

पायऱ्या, भितींही दिसू लागल्या
किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी किल्ल्यामधे नकाशाच्या आधारे उत्खनन करण्यात येत आहे. जुन्या काळातील पुरातन वास्तू नकाशे, मोजमाप नकाशे तसेच किल्ल्याचा आराखडा उपलब्ध झालेला आहे. समोर आलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे नकाशे १८१८ मधील इंग्रज राजवटीतील असल्याचे स्पष्ट होत आहे. या नकाशांमुळे मूळ स्वरूपातील किल्ला समोर येत आहे. काही ठिकाणी उत्खननात पायऱ्या, भिंती दिसून आल्या आहेत. पूर्वी सारखाच संग्रामदुर्ग किल्ला हा दिसावा यासाठी उत्खननात प्रथम जोते तपासणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.