Chakan : पिस्टलसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

इंदरसिंग रामलालसिंग राजपूत (वय 29, रा. नाणेकरवाडी गावठाण, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवडीच्या दिवशी चाकण परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार विठ्ठल सानप आणि गंगाधर चव्हाण यांना माहिती मिळाली की, एकजण नाणेकरवाडी चौकात थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून इंदरसिंग याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी इंदरसिंग याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी इंदरसिंग याच्यावर सिंहगडरोड पोलीस ठाण्यात चोरीचा तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजारात पठाण, सचिन मोरे, योगेश कोळेकर, यदु आढारी, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, राजकुमार हणमंते, महेश भालचिम, प्रमोद ढाकणे, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.