Chakan : कांद्याची चाकण मार्केटला प्रचंड आवक, आवक वाढताच भाव गडगडले; कांदा सरासरी 20 रुपये किलो

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी (दि.29 ) कांद्याची तब्बल 125 ट्रक आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला 20 ते 25 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला असून लहान व मध्यम आकाराच्या कांद्याला 10 ते 12 रुपये प्रतीकीलोला भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

अवकाळी पाऊस , खराब हवामान यामुळे कांद्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटले आहे. आणि त्यातच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरु झाल्याने शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र शासनाने तत्काळ हटवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. बुधवारी दि. २९ जानेवारी २०२० रोजी कांद्याला सरासरी २० रुपये किलो असा दर मिळाला.

मागील शनिवारी (दि. २५ जानेवारी) चाकण मार्केटमध्ये १४ हजार ७३३ क्विंटल कांद्याची आवक होऊन १ हजार २०० ते ३ हजार ३०० रुपये असा कांद्याला प्रतीक्विंटलला भाव मिळाला होता. दरम्यान कांद्याला सरासरी २० ते २२ रुपयांच्या दरम्यानच प्रतीकिलोला भाव मिळाल्याचे उत्तर पुणे जिल्ह्यातून चाकण मार्केटमध्ये कांदा घेऊन आलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.

शासनाने निर्यात बंदी हटवावी
शासनाने कांद्याच्याबाबत योग्य धोरण आखणे गरजेचे आहे. कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येत असल्याचा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे. कांद्याचा हंगाम सुरु झालेला असताना शासनाने तत्काळ निर्यात बंदी हटवली पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.