Chakan : चाकण परिसरात बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट… प्रशासनातील मंडळींच भागीदार !

एमपीसी न्यूज-खेड तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंगची पाळेमुळे (Chakan) खोदण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांना फसवून आणि कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायातील अनेकांचे बुरखे फाडण्याची मागणी होत आहे. चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. नद्यांच्या प्रवाहांना अडथळा ठरतील असे बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या धनदांडग्या मंडळींनी सुरु केला आहे.
शेत जमिनींचे बेकायदा एका-एका गुंठयांचे प्लॉट पाडून विक्री होत आहे. महसूल विभागातील मंडळीं देखील कायद्यातील पळवाटा शोधून अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. चाकण नगरपरिषद आणि लगतच्या औद्योगिक भागातील विविध गावांच्या हद्दीत जमिनींचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे, संबंधित जमिनीच्या अकृषीक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनींवर विकास करणे अपेक्षित आहे. मात्र नियमांच्या फेऱ्यात जाण्याऐवजी अनेकांनी प्रशासनाच्या अपरोक्ष बेकायदा शेत जमिनींचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.
PCMC : कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांचा वाढता आलेख
आता बड्या धनदांडग्यांना आकर्षित करण्यासाठी चक्क नद्यांना लागून असलेल्या सुपीक जमिनीचे तुकडे पाडून बेकायदा प्लॉटिंग करण्यापर्यंत अनेकांची हिम्मत वाढली आहे. रेखांकित जमिनीत आवश्यक रस्ते, जल:निस्सारण गटारांची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था, रेखांकित जमिनीत मोकळा ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे व त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकन धारकाची असताना त्याकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातील मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या बाबी समोर येत आहेत .
चाकण नगरपरिषद आणि लगतच्या एमआयडीसीलगतच्या अनेक गावांमध्येही असे बेकायदा प्लॉटिंग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आता नव्याने नद्यांना लागून अशा प्रकारे प्लॉटिंग सुरु झाले असून त्यावर पुणे जिल्हाधिकारी, महसूल विभागाने, पीएमआरडीएने लक्ष केंद्रित करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाची अर्थपूर्ण साथ !
चाकण मधील नगरपरिषद हद्दीत आणि चाकण एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या सहा- आठ किलोमीटर अंतरावरील भागांमध्ये प्लॉटिंगच्या व्यवसायाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. भूमाफियांसह दलालांनी सर्वत्र गुपचूप शेतजमिनीचे बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे.
चाकण भागातील प्लॉटिंग दलालांनी महसूल प्रशासनातीलच अनेकांना हाताशी धरून डोंगर,टेकड्या, ओढ्यांमधील जमिनींचे आणि वादादित व इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे. आता नद्यांना लागून देखील सुपीक जमिनीचे तुकडे पाडले जात आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून चौपट पाचपट दराने असे भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केले जात आहेत. महसूल विभागातील मंडळीं देखील लालसेतून कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत (Chakan) आहेत.