Chakan : हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश

दोन तरुणींसह तिघे ताब्यात ; महाळुंगे येथील प्रकार

एमपीसी न्यूज- चाकण तळेगाव रस्त्यावर श्री क्षेत्र महाळुंगे (ता. खेड) हद्दीतील हॉटेल कुणाल लॉजिंग अँन्ड बोर्डिंगमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्याचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला असुन दोन हॉटेल चालक, दोन कोलकाता येथील तरुणींना ताब्यात घेतले आहे. हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांच्या विरूध्द पिटा अंतर्गत कारवाई केल्याने या भागातील महामार्गावर चोरीछुपे अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

चाकण पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बाराचे सुमारास छापा टाकून महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणार्‍या हॉटेल चालकासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हॉटेल चालक असलेल्या एका तरुणासह मुळच्या कोलकाता येथील असलेल्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सौरव रवींद्र सांगळे ( वय 23, सध्या रा. राणूबाईमळा,सोनू बिरदवडे यांच्या खोलीत, चाकण, ता. खेड, मूळ रा. बार्शी, ता. सोलापूर) व अप्पा चुंगे ( पूर्ण नाव निष्पन्न नाही ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावाच्या जवळ हॉटेल कुणाल लॉजिंग अँन्ड बोर्डिंग येथे महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकात बनावट ग्राहक म्हणून तेथे दोघांना पाठवण्यात आले. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकातील बनावट ग्राहकाने दिल्याने पोलीस पथकाने सोमवारी मध्यरात्री बाराचे सुमारास थेट हॉटेलवर छापा टाकला.

हॉटेलच्या पुढील दरवाज्याने पोलीस पथकाने प्रवेश केल्याचे पाहताच तेथील व्यवस्थापक पळून गेला. तर पहिल्या मजल्यावरील सातव्या खोलीत सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मुळच्या कोलकाता येथील एक 22 वर्षीय व एक 28 वर्षीय अशा दोन तरुणी आणि पोलिसांनी पाठवलेले बनावट ग्राहक मिळून आले. संबंधित हॉटेलमध्ये अनेक आक्षेपार्ह पाकिटे व वस्तू आढळून आल्या. हॉटेल चालकावर मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार शिवानंद महादेव स्वामी यांनी तक्रार दाखल केली आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, संजय घाडगे, शिवानंद स्वामी यांनी केली आहे. दरम्यान या हॉटेलच्या मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.