chakan : आयकर विभागाकडे अडकलेली मालमत्ता सोडविण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयकर विभागाकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सोडविण्यासाठी चौघांनी मिळून एका दाम्पत्याची 42 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार खेड तालुक्यातील येलवडी येथे घडला.

याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्नेहा सुधीर वेदपाठक (रा. घोडबंदर), पारुमती चक्रवर्ती (रा. मुंबई), नितीन सखाराम गाडेरा, संदीप गाडे (दोघे रा. येलवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 250 ते 300 कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाकडे अडकलेली आहे. आयकर विभागाकडून ती मालमत्ता सोडविण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली.

फिर्यादी यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे राहते घर दुस-याच्या नावावर गहाण ठेऊन पैसे उभे करण्यासाठी प्रवृत्त केले. यातून फिर्यादी आणि त्यांचे पती यांनी मिळून आरोपींना 24 मे 2017 ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत वेळोवेळी 42 लाख रुपये दिले. या पैशांचा अपहार करून आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.