Chakan : चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कल्याण पवार; सुनील पवार यांची सहायक पोलीस आयुक्तपदी पद्न्नोती बदली

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कल्याण पवार यांची नियुक्‍ती झाली आहे. चाकणचे यापूर्वीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांची बुलढाणा येथे सहायक पोलीस आयुक्तपदी पद्न्नोती बदली झाल्याने नवीन अधिकाऱ्यांची चाकण येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. नूतन अधिकारी कल्याण पवार चाकणला येण्यापूर्वी पिंपरी येथे कार्यरत होते.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याआदेशानुसार चाकण पोलीस ठाण्याचा पदभार कल्याण पवार यांनी बुधवारी (दि.२१) सकाळी स्वीकारला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा निरोप समारंभ व कल्याण पवार यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, उपनगराध्यक्ष धीरज मुटके, विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुनील पवार यांनी चाकण दंगली नंतर मनोधैर्य खचलेल्या चाकण पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्या नंतर केलेल्या कामांचा आढावा घेतला; तर चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखून हद्दीतील अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे कल्याण पवार यांनी चाकण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, शेखर कुलकर्णी यांनी आभार मानले.

दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गुन्हेवारीवर अंकुश कायम ठेवून फोफावलेल्या अवैध धंद्यांना चाप लावण्याचे दिव्य नवीन ठाणेदार कल्याण पवार यांच्यासमोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.