Chakan: टेम्पोला धक्का देऊन सुरु करण्यासाठी झोपेतून उठवून एकावर चाकूने वार

त्याने कैलास यांना झोपेतून उठवून त्याचा टेम्पो बंद पडला असून तो धक्का देऊन सुरु करायचा आहे. त्यासाठी धक्का द्यायला माझ्यासोबत चल, असे म्हणून कैलास यांना घरापासून थोड्या अंतरावर नेले.

एमपीसी न्यूज – टेम्पो बंद पडला असून त्याला धक्का देऊन सुरु करायचा असल्याचे सांगत एकाला झोपेतून उठवून टेम्पो सुरु करण्यासाठी नेले. तिथे त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि आरोपी पळून गेला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेअकरा वाजता खेड तालुक्यातील काळूस येथे घडली.

कैलास गुलाब दौंडकर (वय 35, रा. संगमवाडी, काळूस, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विवेक राजू शेळके (रा. काळूस, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास बुधवारी रात्री त्यांच्या घरी झोपले होते. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी विवेक फिर्यादी यांच्या घरी आला.

त्याने कैलास यांना झोपेतून उठवून त्याचा टेम्पो बंद पडला असून तो धक्का देऊन सुरु करायचा आहे. त्यासाठी धक्का द्यायला माझ्यासोबत चल, असे म्हणून कैलास यांना घरापासून थोड्या अंतरावर नेले.

घरापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर विवेक याने कैलास यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. तसेच दोन्ही हातावर चाकूने मारले. यात कैलास गंभीर जखमी झाले. वार केल्यानंतर आरोपी विवेक तिथून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.