Chakan : चाकणमधील मजुरांनी आठवड्यात पायी गाठले वर्धा ; घरच्या ओढीने 12 मजुरांनी पार केले सातशे किलोमीटर अंतर

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – दिवसभर चालायचं… रात्री एखाद्या गावात विश्रांती घ्यायची… जिथं जे मिळेल ते खायचं… एखाद्या ठिकाणी काही मिळालंच नाही, तर उपाशीपोटी पायपीट सुरू ठेवायची. दिवसरात्र डोक्यात एकच विचार ‘घरी आई-वडील वाट पाहत असतील, त्यांच्या जीवाला घोर लागला असेल’ बस्स… या एकाच विचाराने 12 मजुरांनी सात दिवस चालत चालत पुणे जिल्ह्यातील चाकण येथून वर्धा शहर गाठले. वर्धा शहराजवळ असलेल्या सालोड (हिरापूर) गावात एक रात्र विश्रांती घेऊन ते आता नागपूर येथील आपल्या मूळ गावी निघाले. घराच्या ओढीने या मंडळींनी पायी सुमारे ७०० किलोमीटर अंतर अवघ्या आठवड्यात कापले आहे.

दिल्ली येथून राजस्थान, उत्तर प्रदेश येथील विविध शहरात पायी जाणाऱ्यांविषयी वारंवार ऐकायला, पाहायला मिळत आहे. हे तातडीचे स्थलांतर मजूर, कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात केले आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना जिथल्या तिथे थांबण्याचे आवाहन केले जात आहे. कधी आवाहन, समजावणे, दम देणे, लाठीचा प्रसाद देणे, यापुढे जाऊन नोटीस आणि प्रसंगी गुन्हे दाखल केले जात आहेत.

प्रशासनाकडून केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हे दाखल करणे एवढेच केले जात नाही. तर जे नागरिक, कामगार, मजूर अडकून पडले आहेत. जगण्याची भ्रांत पडलेल्यांसाठी सरकारने रिलीफ कॅम्प सुरू केले आहेत. जेवण, राहणे, स्वच्छता आणि आरोग्य या चतुसूत्रीचा पुरवठा सक्षमपणे केला जात आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या सीमा सील करून तिथून पुढे नागरिकांना सोडले जात नाही. एकतर परत जावे, अथवा प्रशासनाच्या रिलीफ कॅम्पमध्ये थांबावे, अशा सूचना देऊन नागरिकांची सोय केली जात आहे.

तरीदेखील प्रशासनाची नजर चुकवून नागरिक जिल्हा, राज्याचे सीमोल्लंघन करीत आहेत. सर्वच राज्यात पायपीट करून घर गाठण्यासाठी धडपडणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच चाकण येथील एक प्रकार समोर आला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील चाकण शहरात नागरपूरहून काहीजण दाखल झाले. मजुरी करून जगत असताना अचानक या कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले. या सूक्ष्म विषाणूने संपूर्ण जगाला वेढा घायकुतीला आणले. अनेक शहरे, देश अचानक बंद पडले आणि कामगार मजुरांना कामासह पोटाचीही भ्रांत पडली.

पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. काम बंद पडले, खायची पंचायत त्यात वृद्ध आई-वडील नागपूर जिल्ह्यात. यामुळे त्या मजुरांची चांगलीच पंचाईत झाली. ही पंचाईत झाली असली तरी प्रशासनासह अनेक सामाजिक संस्थांचे हात त्यांच्या मदतीला येऊ शकत होते. पण हे सर्व मार्ग झुगारून अखेर त्यांनी चाकण येथून पायी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि 12 मजुरांचा प्रवास सुरु झाला.

अंगावर मळकट कपडे, पाठीवर सामानाच्या पिशव्या आणि नजरेसमोर वारंवार येणारे घर आणि पालकांचे विचार घेऊन ही मंडळी 26 मार्च रोजी चाकण येथून निघाली. वाटेत मिळेल ते, लोक देतील ते अन्न खायचे. रात्री एखाद्या गावकुसात आडोसा शोधायचा, रात्रभर आराम केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पायपीट सुरू. असे तब्बल सात दिवसात त्यांनी 630 किलोमीटर अंतर पार केले. एवढे अंतर पार करून ही मंडळी 2 एप्रिल रोजी वर्धा शहराजवळील सालोड (हिरापूर) येथे पोहोचली. पुढील 80 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पार करण्यासाठी 3 एप्रिल रोजी भल्या पहाटे सर्वजण निघून गेले.

संचारबंदी लागू झाल्यानंतर ज्यांच्याकडे वाहनांचा जुगाड आहे, त्यांनी तात्काळ घर, गाव गाठले. पण ज्यांच्याकडे वाहनांची उपलब्धता नाही असे मात्र अडकून पडले. त्यांनी घाबरून जाऊ नये, संयमाने, धीराने या संकटाला तोंड द्यावे, असे आवाहन करूनही या मंडळींना फारसा फरक पडलेला दिसत नाही.

पायी प्रवास करणारा एकजण म्हणला, “हा कर्फ्यु कधीपर्यंत लागू राहील, याबाबत काहीच सांगता येत नाही. लॉकडाऊनमुळे हाताला काम राहिले नव्हते. त्यामुळे आम्ही पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like