Chakan : चाकणमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले; दोन दिवसांत दोन गुरे ठार

एमपीसी न्यूज : बिबट्याचा चाकण परिसरात धुमाकूळ (Chakan) सुरूच असून, रविवारी (दि.26) बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची बाब कातकरीवस्ती ( पठारवाडी ) भागात समोर आली आहे. ठिकठिकाणी बिबट्या दिसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. चाकणच्या कातकरी वस्ती लगतच्या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत एक कुत्रे आणि एक शेळी अशा दोन पाळीव जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

चाकण शहर आणि लगतच्या एकतानगर, पठारवाडी भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसापूर्वी चाकणच्या एकतानगर भागात बिबट्या दिसून आला. वनविभागाने तपासणी केली असता बिबट्याचे पगमार्क आढळून आले. तातडीने याठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले.

मात्र पिंजरा लावलेल्या भागाकडे त्यानंतर बिबट्या फिरकलाच नाही. लगतच्या कातकरी वस्तीवर बिबट्या पाहिल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यानंतर याच कातकरी बांधवांच्या शेळीचा फडशा बिबट्याने पडल्यानंतर संपूर्ण चाकण लगतच्या भागात बिबट्याचा संचार असल्याची बाब समोर आली आहे.

चाकण वनविभागाच्या अधिकार्यांनी रविवारी सकाळी पठारवाडी जवळील कातकरी वस्तीवर जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुरांचा पंचनामा केला आहे. वनविभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

चाकण शहराच्या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यास पकडण्यात (Chakan) वनविभागाला लवकरच यश असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन चाकण वनविभागाकडून करण्यात आल्याचे रेस्क्यू टीमचे सदस्य प्रा. अतुल सवाखंडे यांनी सांगितले.
दरम्यान चाकणच्या कातकरी वस्तीवर तातडीने वीज, दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी चाकण विकास मंचचे कुमार गोरे, अॅड. निलेश कड, राम गोरे आदींनी केली आहे.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘ट्रिनिटी अकॅडमी’तर्फे नवीन शिक्षण धोरणावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

अफवांचे देखील पेव :

चाकण शहरात रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या गल्ली- बोळात बिबट्या आल्याच्या अफवांचे पिल्लू सोशल मीडियावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांत अधिकच भीतीचे वातावरण होत आहे. चाकण परिसरात बिबट्या असल्याच्या वस्तुस्थितीने अनेक नागरिक यावर विश्वास ठेवत असल्याने संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीत बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सतत अशा खोट्या अफवांचे पेव फुटत असल्याने कधीतरी ‘लांडगा आला रे आला’ उक्तीप्रमाणे स्थिती होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.