Chakan : रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लग्न ; लग्नानंतर तरुणाची धूम

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; चाकण पोलिसांत गुन्हा

एमपीसी न्यूज- लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने एका तरुणीवर वर्षभर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाला तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला. नकार ऐकताच तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, काही संघटनांच्या दबावामुळे संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र लग्न लागताच तरुणाने तिथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी चाकण येथे घडला असून आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील व सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या सव्वीस वर्षीय पिडीत तरुणीने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी बुधवारी ( दि. 4) सुरज भारत नलावडे ( मूळ रा. नावडी, ता. पाटण, जि. सातारा, सध्या रा. राणूबाई मळा, चाकण,ता. खेड,) याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सबंधित पिडीत तरुणी चाकण येथे तिच्या मैत्रिणी बरोबर आंबेठाण चौकात राहत असताना सुरज व त्या पिडीतेची गेल्या वर्षी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सुरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. सोमवार ( दि. 29 एप्रिल ) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सुरज याने तिच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून तिला चाकण मार्केटयार्ड मधून त्याच्या दुचाकीवर बसवून चाकण येथील राणूबाई मळा येथे त्याच्या राहत्या घरी आणले. तिच्याशी गोड गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवून घरात कोणी नसल्याची संधी साधत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यानच्या काळात संबंधित तरुणीने सुरज याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता आपण एका जातीचे नाही, असे म्हणून तिला भेटण्याचे टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणी हवालदिल झाली. त्यामुळे तिने थेट सुरज याचे घर गाठून याबाबत त्याच्या घरच्यांना विचारणा केली. त्यांनी त्या दोघांच्या लग्नास नकार देताच त्या पिडीत तरुणीने सुरज याच्या घरात सर्वांच्या समोर फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पिडीत तरुणीवर अन्याय झाल्याचे आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीना कळाले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीच्या सोबत संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले होते. मात्र संघटनेच्या दबावातून रुग्णालयातील लग्नाचे सोपस्कार पार पडताच संबंधित तरुणाने धूम ठोकली.

सबंधित पिडीत तरुणीने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी सुरज नलावडे याच्या विरोधात भा.द.वि.कलम 376 अन्वये अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम (2), (व्ही.ए.), 3 ), (1) (आर.), (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.