BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चाकण ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून रस्त्याच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे कंत्राट काळोखे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याच माध्यमातून मोजणी करण्यात येत आहे. चाकण नगरपालिका हद्दीत हा रस्ता दोन्ही बाजूला १२ मीटरचा म्हणजे रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा तब्बल २४ मीटरचा होणार आहे. मात्र, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांचा विळखा पडला असून या मार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या या अतिक्रमणांवर कारवाईनंतरच महामार्गाचे रुंदीकरण व रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होऊ शकणार आहे.

प्रजीमा क्र.२० अंतर्गत येणाऱ्या भांबोली-आंबेठाण-चाकण या दहा किलोमीटरच्या रस्त्यासह निघोजे-मोई-चिंबळी आणि मावळ तालुक्यातील तळेगाव खिंड ते नवलाख उंबरे, आंबी अशा एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या तीन रस्त्यांच्या २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख मार्गांची कामे ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत हे रस्ते होणार आहेत.

  • मागील अनेक महिने या रस्त्यांची कामे बँकेचे कर्ज आणि विविध कारणांनी प्रलंबित राहिले होते. मात्र, स्थानिकांची मागणी आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग, चाकण नगरपरिषद, महावितरण आणि लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याची एकत्र पहाणी करून सर्वेक्षण केले होते.

भांबोली-आंबेठाण-चाकण दरम्यानचा दहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता सिमेंटकॉंक्रीटचा होणार असून त्याची रुंदी ३० फुट असणार आहे. मात्र, या मार्गावरील वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या, वाहन संख्या यामुळे चाकण नगरपालिका हद्दीत आंबेठाण चौक ते दावडमळा दरम्यानच्या दोन किमी भागात हा रस्ता तब्बल २४ मीटरचा होणार आहे. मात्र, या भागात रस्त्याचे रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणावर रस्त्यापर्यंत झालेली अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा १२ मीटर म्हणजे तब्बल २४ मीटरचा प्रशस्त रस्ता करताना रस्त्यावरील शेकडो व्यावसायिक गाळे, निवासी घरांचा रस्त्याकडील भाग निष्कासित करावा लागणार आहेत. त्यासाठी स्थानिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा प्रशस्त रस्ता झाल्यास येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

  • अधिकारी म्हणतात …
    वरिष्ठ प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशासानुसार चाकणमधील आंबेठाण चौकापासून पुढे दोन कि.मी (दावडमळापर्यंत) २४ मीटर रस्त्याचे प्रयोजन आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर अंतरावर खुणा करण्यात येत आहेत, असे या रस्त्याचे काम करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रकल्प अधिकारी अंकेत वानखेडे, अनिल घाटगे, अभय वाघ यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

.