Chakan : महाळुंगे पोलीस चौकी कार्यान्वित; चाकणच्या पश्चिमेकडील २२ गावांचा समावेश

पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन; चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. मंगळवार (दि. २)पासून ही पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली असून या चौकीमध्ये पूर्वीच्या चाकण हद्दीतील पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील २२ गावांचा समावेश केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन करण्यात आले.

चाकणमधील औद्योगिकरणामुळे चाकण- महाळुंगे परिसर संवेदनशील झाला असून मानवी संरक्षण, मालमत्तेचे रक्षण, वाढत्या गुंडगिरीवर लगाम, परिसरातील कामगार आणि नागरिकांची सुरक्षितता ,वाढत्या चोरी व लुटमारीच्या घटना यामुळे सुरु राहणारी धुसफूस , सातत्याने सुरू असणारे, खून, खुनाचा प्रयत्न, यादृष्टीने स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असे मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते.

  • चाकण एमआयडीसीसाठीच्या महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथील नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा नवीन प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक सीमा बदलाची अभ्यास प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मात्र, डीजी कार्यालय स्तरावरून महाळुंगे साठी नवीन चौकीला मान्यता देण्यात आल्या. नंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून या चौकीचा शुभारंभ मंगळवारी (दि.२) पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , विनायक ढाकणे, सहा.पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चाकण एमआयडीसी मधील विविध कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते.

  • नवीन चौकीत या गावांचा समावेश
    मोई, कुरुळी, निघोजे, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे ,आंबेठाण, वराळे, सावरदरी, खालुंब्रे, भाम्बोली, शिंदे, वासुली, येलवाडी, सांगुर्डी , कान्हेवाडी, बीरदवडी, रोहकल, पिंपरी खुर्द, गोनवडी, बोरदरा, कोरेगाव खुर्द या पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील बावीस गावांचा नवीन महाळुंगे ( इं.) चौकीत समावेश करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांची या चौकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुरुवातीला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा साठ पोलिसांची नेमणूक येथे करण्यात आली आहे. दरम्यान पुढील काळात पाईट येथेही स्वतंत्र चौकी सुरु करण्याचे पोलीस प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

कारखानदारांनी निर्भयपणे माहिती द्यावी – आर.के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त
प्रस्तावित असलेल्या महाळुंगे पोलीस स्टेशनला शासन स्तरावरून मान्यता येईपर्यंत चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळूंगे पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील बावीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. औद्योगिक भागातील माथाडी, ठेकेदारी यासाठी कुठलीही जबरदस्ती होत असल्यास या भागातील कारखानदारांनी निर्भयपणे किमान पोलिसांना माहिती तरी दिलीच पाहिजे. त्यावर तत्काळ कारवाई करण्याची पोलीस प्रशासनाची भूमिका आहे. महाळुंगे चौकीत समाविष्ट झाल्याने चाकण लगत असणाऱ्या कुठल्याही गावांची गैरसोय होत असल्याची बाब समोर असल्यास त्याबाबत पुनर्विचार विचार केला जाईल, असेही पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.