Chakan : खून करून मृतदेह जाळला; तीन वर्षानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खून करून मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडला. हा प्रकार 31 ऑक्टोबर 2015 पूर्वी घडला असून याप्रकरणी सोमवारी (दि. 24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्ष आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2015 रोजी खेड तालुक्यातील शेलगाव येथे नदीच्या बाजूला एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र केवळ अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेह आढळलेल्या जागेवर मृतदेहाच्या बाजूला गोलाकार गवत जळालेले होते. जर मृत व्यक्तीने स्वतः पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तर जवळच नदी होती. आगीच्या दाहाने त्याने नदीकडे धाव घेतली असती. तसेच एका जागेवरून दुस-या जागेवर हलण्याचा प्रयत्न केला असता, मात्र असा प्रकार आढळून आला नाही. त्यावरून त्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.

हा प्रकार अकस्मात मृत्यूचा नसून खुनाचा असल्याचा संशय चाकण पोलिसांना आल्याने तब्बल तीन वर्षानंतर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अजूनही पटली नसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.