Chakan : छेडछाडीची पोलिसात तक्रार दिल्यावरून अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

Murder of a minor girl in Chakan

एमपीसी न्यूज – मुलीची छेडछाड केल्याने झालेल्या वादातून पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्या कारणावरून तीन जणांनी मिळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत कॅनॉलच्या दरडीजवळ घडली.

मयत मुलीच्या 34 वर्षीय मामाने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चंद्रकांत पाटीलबुवा कोळेकर, अक्षय किसन कोळेकर, सुनील महादेव कोळेकर (सर्व रा. थोपटेवाडी, ता. खेड) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी आरोपींनी फिर्यादी यांच्या मयत भाचीची छेड काढली होती. त्यावरून त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाची तक्रार मयत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात केली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्याचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या मयत भाचीला आसखेड खुर्द गावच्या हद्दीत कॅनॉलच्या दरडीजवळ नेऊन तिच्या डोक्यात आणि चेह-यावर कठीण वस्तूने मारून गंभीर जखमी केले. त्यातच मुलीचा मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत मुलीचा मृतदेह कॅनॉलजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली टनटणीच्या झुडुपात टाकून दिला.

घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 नुसार खून आणि खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दुबे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.