Chakan : मुस्लिम समाजाला आरक्षण हवेच ! ; चाकण येथील आरक्षण परिषदेत मागणी

शेकडो मुस्लीम बांधवांची उपस्थिती

एमपीसी न्यूज- मराठा, धनगर आरक्षण आंदोलनाच्या पाठोपाठ मुस्लिम समाजही आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. मुस्लिम समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी चाकण (ता. खेड) येथे शनिवारी (दि.1) आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण परिषदेत करण्यात आली. चाकण शहर आणि परिसरातील शेकडो मुस्लिम समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी पुण्यात मुस्लिम महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम मूक महामोर्चाच्या कोअर कमिटीच्या प्रतिनिधींना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मुस्लिम समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात मागासलेला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा व सामाजिक प्रवाहात समाज पुढे यावा यासाठी शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांना प्रा. गफूर पठाण, राजू इनामदार, मुन्नवर कुरेशी यांनी मार्गदर्शन केले.

आरक्षण परिषदेचे स्वागताध्यक्ष जमीर काझी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुस्लिम आरक्षणाची जोरदार मागणी केली. अस्लमभाई सिकीलकर, राजू काझी, साजिद सिकीलकर, निसार पिरजादे, मुबीन काझी, पापा मुंढे यांनी समाजाचे विविध प्रश्न या आरक्षण परिषदेत मांडले. यावेळी समीर सिकीलकर, रफिक काझी, नसरुद्दिन इनामदार, अजित सिकीलकर, अशपाक शेख, नझीर बागवान, फिरोज खान, इस्माईल सिकीलकर, अजीम शेख, आरिफ काझी, बाबा काझी, खालिद आतार, रफिक पठाण, सादिक काझी, अब्दुलरहीम शेख, वासिम काझी, दिलावर आतार आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम युवक म्हणतात…. :

मुस्लिम समाजाला रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, डॉ. महेमुद्दल आयोगाच्या अहवालावर अधारीत आरक्षण, शिक्षण व संरक्षण मिळालेच पाहिजे, मुस्लिम समाजाची अवस्था सर्वच क्षेत्रात मागासलेली असतानाही शासन स्तरावर मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी केला. समाजाच्या आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी उपस्थित अनेक युवक मुस्लिम कार्यकर्त्याकडून देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.