Chakan: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी -डॉ. शैलेश मोहिते-पाटील

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांची संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी मोहिते पाटील यांना नवी दिल्ली येथे नियक्तीपत्र प्रदान केले.

डॉ. शैलेश मोहिते पाटील यांनी 2004 ते 2014 या कालावधीत तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि पदे सक्षमपणे सांभाळली. 2014 ते 2016 या कालावधीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते. या काळात युवक जोडो अभियानांतर्गत विकास रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. 2016 ते 2018 या कालावधीत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले. या काळात विदर्भ, नाशिक, अहमदनगर, सांगली या भागांचे पक्ष निरीक्षक म्हणून काम पाहिले.

  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या समवेत त्यांनी जुलै 2018 पासून देशातील विविध राज्यांचे दौरे केले. कर्नाटक, केरळ, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, लक्षद्वीप, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोर्चे, रास्ता-रोको, सभा तसेच विविध आंदोलनांच्या आयोजनात त्यांचा मोलाचा सहभाग घेतला.

भारतातील 14 धर्मनिरपेक्ष पक्षांच्या युवक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘युनायटेड यूथ फ्रंट’ या संघटनेच्या माध्यमातून जंतर-मंतर, दिल्ली, वाराणसी या ठिकाणी युवक मोर्चाच्या यशस्वी नियोजनात त्यांचा सहभाग होता. मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव’ आंदोलनातही ते सक्रिय सहभागी होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पक्ष बांधणी आणि पक्ष वाढीसाठी डॉ. मोहिते-पाटील यांनी वेगवेगळ्या पातळीवर संपूर्ण निष्ठेने व सच्चाईने काम केले आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढविण्यात येत असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नियोजनबद्ध काम करावे, अशी सूचना शरद पवार यांनी डॉ. मोहिते-पाटील यांना केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम करणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, असा सकारात्मक संदेश आपल्या निवडीमुळे युवक कार्यकर्त्यांमध्ये गेल्याचे डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी सांगितले. ही मोठी जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, धीरज शर्मा, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ या नेत्यांबरोबरच त्यांनी युवक संघटनेतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवीन, अशी ग्वाही डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.