Chakan News : संततधार पाऊस आणि वाहने बंद पडल्याने तब्बल 22 तास वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – सतत सुरु असलेला संततधार पाऊस आणि त्यानंतर भर रस्त्यात वाहने बंद पडल्याने चाकण परीसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी तब्बल 22 तास सुरु असून वाहतूक पोलिसांनी रात्रभर काम करुन २२ तासानंतर बंद पडलेल्या गाड्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली आहे.

बुधवारी (दि. 1) राज्यात अनेक ठीकाणी मुसळधार पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरु होती. याचा फटका वाहतूकीला बसला आहे. पावसामुळे रस्त्यात वाहने बंद पडली. यामुळे तळेगाव-चाकण आणि तळवडे-चाकण या दोन्ही मार्गांवर काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

तळेगाव, म्हाळुंगे, चाकण, तळवडे हा औद्योगिक वसाहतींचा भाग आहे. या भागात मुंबई, राज्यासह, देशभरातील सर्व भागातून मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर ब्रेकडाऊन झाली. रस्त्यात वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. तळेगाव-चाकण रस्त्यावर सुमारे 20 ते 22 वाहने बंद पडली. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

तसेच तळवडे-चाकण रस्त्यावर देखील काही वाहने बंद पडल्याने हा मार्ग देखील वाहतूक कोंडीत हरवला. दुपारी दोन वाजता वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी काढण्यास सुरुवात केली. बुधवारी दिवसभर, रात्रभर आणि गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सुरळीत करत होते. बंद पडलेली वाहने बाजूला घेणे, विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांना त्यांच्या लेनमधून पाठवणे अशा अनेक अडचणींना पार करून तब्बल २२ तासाच्या अथक परिश्रमानंतर वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतूक सुरळीत केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एम के आदलिंग म्हणाले, “वाहतूक पोलिसांनी बुधवारचा पूर्ण दिवस, त्यांनतर संपूर्ण रात्र आणि गुरुवारचा अर्धा दिवस रस्त्यावर उभा राहून वाहतूक सुरळीत केली आहे. अनेक वाहने लेन कटिंग करून येतात. चाकण परिसरात अंतर्गत रस्त्यांवर डिव्हायडर नसल्याने अनेक वाहने विरुद्ध दिशेने येतात. काही वाहने अचानक वळतात, अशा अनेक कारणांमुळे चाकण परिसरात वाहतूक कोंडी होते. बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक वाहने बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.”

अनेकांना लेट मार्क
कंपन्यांमध्ये काम करणा-या अनेक कामगार, अधिका-यांना या वाहतूक कोंडाचा फटका बसला आहे. वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने दुस-या मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध न झाल्याने अनेकांना कंपनीत, अॉफिसला पोहोचायला उशिर झाला. तर वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी त्यांच्या सहका-यांना दुस-या मार्गाने येण्याचा सल्ला दिल्याने त्यांनाही कंपनीय यायला उशीर झाला. यामुळे गुरुवारी अनेकांना लेटमार्क लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.