Bhama Askhed Agitation: आंदोलनाची दाहकता दाखवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला पोलीस वाहनातून ढकलून देत मारण्याचा प्रयत्न

यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. याबाबत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

एमपीसी न्यूज – भामा आसखेड आंदोलनाची दाहकता दाखवण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नऊ जणांनी मिळून एका आंदोलकाला पोलिसांच्या वाहनातून ढकलून देत मारण्याचा प्रयत्न केला. तसेच यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. याबाबत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 31) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील धामणे गावच्या हद्दीत घाटात घडली.

अजय संजय नवले (वय 20, रा. वाह्गाव, ता. खेड), शिवाजी भगवान राजगुरव (वय 25, रा. अखतुली, ता. खेड), रामदास बबन होले (वय 40, रा. कासारी, ता. खेड), सुनील रामभाऊ भालसिंग (रा. काळीये, ता. खेड), दत्तू ममता शिवेकर (रा. शिवे, ता. खेड), अरुण सुदाम कुदळे (वय 30, रा. देवतोरणे, ता. खेड), नवनाथ दत्तात्रय शिवेकर (रा. शिवे, ता. खेड), तान्हाजी सहादू डांगले (रा. पराळे, ता. खेड), गणेश काळूराम जाधव (वय 32, रा. गवारवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नामदेव पाषाणकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून भामा-आसखेडच्या पाण्यावरून स्थानिक शेतकरी आणि प्रशासन यांच्यात वाद सुरु आहे. प्रशासनाकडून स्थानिक शेतक-यांना मोबदला मिळाला नसून स्थानिक शेतक-यांकडे प्रशासन तसेच राजकीय मंडळी लक्ष देत नाहीत, असे आंदोलकांचे मत आहे.

भामा-आसखेड धरणातून पुणे शहराकडे जलवाहिनी नेण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतक-यांनी प्रशासनाकडे त्यांना आर्थिक मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला आहे. मात्र प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा शेतक-यांचा आरोप आहे.

सोमवारी स्थानिक शेतकरी करंजविहीरे येथे एकत्र जमले. त्यांनी घोषणाबाजी देत जलवाहिनीचे काम बंद पाडले. पोलिसांनी आंदोलक शेतक-यांना वारंवार सूचना देऊनही शेतकरी ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यातील नऊ जणांना एका पिंजरा गाडीतून पोलीस ठाण्यात कारवाईसाठी नेण्याचे ठरवले.

फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता पाषाणकर यांच्याकडे नऊ जणांना पोलीस स्टेशनला नेण्याची जबाबदारी दिली होती. पिंजरा गाडीतून घेऊन जात असताना धामणे गावाजवळ असलेल्या घाटात गाडीचा वेग कमी होता. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या आंदोलनाची दाहकता वाढविण्यासाठी त्यांच्यातीलच एका ज्येष्ठ नागरिकाला गाडीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल पाषाणकर यांना ढकलून देऊन जबाजी दगडू सातपुते (वय 70, रा. शिवे, ता. खेड) यांना पोलिसांच्या वाहनातून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पाषाणकर हे जखमी झाले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक जबाजी सातपुते देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड म्हणाले, पोलिसांकडून आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली होती. कोरोना काळात लागू असलेल्या संचारबंदी, जमावबंदीबाबत देखील माहिती दिली होती. मात्र आंदोलकांनी सूचनांचे पालन न करता एकत्र येऊन आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलकांनी पोलीस वाहनातून त्यांच्यातीलच एकाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला आहे. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.