Chakan News: गुरांचा बाजार चार महिन्यांनी पूर्ववत

एमपीसी न्यूज – कृषी उत्पन्न बाजार समिती खेड (जि. पुणे) यांचे महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथील दर शनिवारी भरणारा सर्व प्रकारच्या गुरांचा आठवडे बाजार शनिवार (दि.31 डिसेंबर) पासून पुन्हा सुरु झाला आहे. मागील चार महिने बंद असलेला बाजार सुरु झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी बाजारात मोठी गर्दी केली होती.

चाकण बाजारात तब्बल 215 बैल, 60 गाई, 207 म्हैस व 9 हजार 140 शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. गुरांचा बाजारात 2 कोटी 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम 2009 च्या अनुषंगाने लंम्पी स्कीन आजार बाधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर जनावरांचे आठवडे बाजार बंद होते. चाकण येथील जनावरांचा बाजार (गाय, बैल, म्हैस, रेडे इत्यादी) जनावरांचा बाजार पुन्हा शनिवार पासून नियमित सुरू झाला आहे.

बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले की, गुरे निरोगी असल्याची खात्री करण्यात आले. जनावरांना लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केलेले असल्याची खात्री करण्यात आली. कानात टॅग, नंबर बिल्ला, विहित नमुन्यातील आरोग्य दाखला व वाहतूक प्रमाणपत्र यांची खात्री केल्याचे देखील बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पशुपालक शेतकऱ्यांनी सांगितले की, गुरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे, मात्र पशुवैद्यकीय विभागाने या बाबतची कागदपत्रे, दाखले दिलेले नाहीत. शासनच्या जाचक अटींमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.