Chakan News : बनावट चावीच्या सहाय्याने ATM मधून आठ बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज – चोरटे एटीएममध्ये चोरी करताना एटीएम मशीन ऐवजी एटीएम सेंटरमधील अन्य वस्तू चोरण्यावर भर देत आहेत. मागील आठवड्यात दिघी येथे अज्ञात चोरट्यांनी एटीएम मधून बनावट चावीच्या सहाय्याने मशीन उघडून सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. आणखी असाच एक प्रकार म्हाळुंगे येथे उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मधून आठ बॅटरी चोरून नेल्या आहेत.

गणेश नामदेव करमारे (वय 37, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे इंगळे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. 18 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला. एटीएम रूमच्या पाठीमागे असलेल्या बॅकरूमचे लॉक बनावट चावीच्या सहाय्याने उघडले. बॅकरूममध्ये लोखंडी रॅकवर ठेवलेल्या 42 हजारांच्या आठ बॅट-या चोरून नेल्या. याबाबत 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

24 सप्टेंबर रोजी माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी चऱ्होली येथे एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. या दोन एटीएम सेंटरमध्ये बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम मशीन उघडून त्यातून सीपीयु आणि एस अँड जी कंपनीचे लॉक असा एकूण एक लाख रुपयांचा माल चोरून नेला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चोरटे आता एटीएम मशीन फोडून रोकड न चोरता एटीएम सेंटरमधील अन्य साहित्य चोरून नेत आहेत. चोरटे बनावट चावीच्या सहाय्याने हे प्रकार करत असल्याने माहितीतील व्यक्तींकडून तर हे चोरीचे प्रकार केले जात नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.