Chakan News: कामावरून बिनसल्याने रस्त्यात अडवून दहशत निर्माण करणा-या टोळक्याला बेड्या; महाळुंगे पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – कंपनीत कामावरून वरिष्ठासोबत एका कामगाराचे बिनसले. त्या रागातून कामगाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एचआरला रस्त्यात आडवून दहशत निर्माण केली. तसेच एचआरच्या कारवर दगड मारून नुकसान केले. ही घटना 28 जानेवारी रोजी सावरदरी येथे घडली. या गुन्ह्यातील सहा जणांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.

प्रल्हाद शांताराम बच्चे (वय 28, रा. मु. हेद्रुज, पो. पाईट, ता. खेड), समीर माणिक कारले (वय 21, रा. मु.पो. चांदुस ता. खेड), अक्षय शिवाजी घाडगे (वय 24, रा. मु. हेद्रुज पो. पाईट ता. खेड), अक्षय ऊर्फ सुधीर विलास सोनवणे (वय 26, रा. निघोजे, ता. खेड), रुपेश खंडु वाळके (वय 30, रा. मु. रेटवडी पो. घाटवस्ती ता. खेड), सचिन रामदास विरकर (वय 30, रा. मु. रेटवडी, पो. घाटवस्ती, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उदय धर्मराज पिसाळ (वय 46, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली होती.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिसाळ हे सुप्रिम फॅसिलिटीजच्या माध्यमातून रिलायन्स वेअर हाऊस भांबोली या ग्रॉसरी वेअर हाऊसचे कामकाज पाहतात. तिथे पिसाळ आणि आरोपी समीर या दोघांचे कामावरून बिनसले. त्याचा राग समीर याच्या मनात होता. त्या रागातून 28 जानेवारी रोजी पिसाळ कामावरून घरी जात असताना आरोपी समीर याने त्याच्या पाच साथीदारांना घेऊन पिसाळ यांना रस्त्यात अडवले. जोरजोरात हॉर्न वाजवून कारचा पाठलाग केला. तसेच कारवर दगड मारून नुकसान केले.

घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी पिसाळ यांच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केली. तसेच तांत्रिक तपास करून आरोपींची ओळख पटवली. समीर याला संशयावरून ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी बुलेट दुचाकी, यामाहा दुचाकी, दोन कोयते, लाकडी दांडके, दगड असा एकूण एक लाख 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, राजू जाधव, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, बाळकृष्ण पाटोळे, श्रीधन इचके, शदर खैरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.