Chakan News: ओएलएक्सवर वस्तू विकताय, सावधान ! खरेदीच्या बहाण्याने आलेला व्यक्ती मोबाइल घेऊन पळाल्याच्या चार घटना उघड

ती जाहिरात पाहून आरोपीने त्यांच्याशी संपर्क केला. मोबाइल फोन खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपी 16 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता पवळे यांच्या घरी आला. मोबाइल फोन बघण्यासाठी घेऊन आरोपी विश्वासघात करून दुचाकीवरून पळून गेला.

एमपीसी न्यूज – तुम्ही जर ओएलएक्सच्या माध्यमातून तुमच्या जुन्या वस्तू विकत असाल तर खरेदी करण्यासाठी येणा-या व्यक्तीपासून सावध राहा. चाकण परिसरात एकाच वर्णनाच्या व्यक्तीने दहा दिवसांच्या कालावधीत चार जणांचे मोबाइल फोन खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन पळवून नेले आहेत. याबाबत गुरुवारी (दि.10) चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात साहिल सतीश कड (वय 21, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. कड यांनी त्यांचा 23 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन विकण्याची जाहिरात ओएलएक्सवर दिली होती.

ती जाहिरात पाहून अनोळखी आरोपी 18 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी कड यांच्या घरी आला. आरोपीने कड यांचा विश्वास संपादन करून मोबाइल फोन घेऊन दुचाकीवरून पळून गेला.

दुस-या प्रकरणात सागर काळूराम पवळे (वय 21, रा. कळूस जाचक वस्ती, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पवळे यांचा 21 हजार रुपयांचा मोबाइल फोन ओएलएक्सद्वारे विकायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यावर जाहिरात दिली होती.

ती जाहिरात पाहून आरोपीने त्यांच्याशी संपर्क केला. मोबाइल फोन खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपी 16 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता पवळे यांच्या घरी आला. मोबाइल फोन बघण्यासाठी घेऊन आरोपी विश्वासघात करून दुचाकीवरून पळून गेला.

तिस-या प्रकरणात सागर समाधान तायडे (वय 21, रा. बीरदवडी मुळे वस्ती, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी तायडे यांच्यासोबत देखील अशाच प्रकारचा प्रसंग घडला. त्याना देखील त्यांचा 10 हजारांचा मोबाइल फोन विकायचा होता.

त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून आरोपी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तायडे यांच्या घरी आला. त्याने मोबाइल बघण्यासाठी घेतला आणि दुचाकीवरून पळून गेला.

चौथ्या प्रकरणात अभिषेक तुकाराम वाळके (वय 18, रा. खरपुडी) यांनी फिर्याद दिली आहे. वरील तिन्ही प्रकारांप्रमाणेच वाळके यांच्या सोबत देखील आरोपीने विश्वासघात करून त्यांचा 21 हजारांचा फोन पळवून नेला आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता आळंदी फाटा चाकण येथे घडली.

ओएलएक्स वरील आकाराने लहान असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने त्या चोरणे हे चोरट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहे. त्यामुळे चोरटे या ट्रिकचा वापर करत आहेत.

नागरिकांनी त्यांच्या वस्तू ओएलएक्स सारख्या ऑनलाइन माध्यमातून विकताना समोरच्या व्यक्तींची खात्री करावी, नंतरच त्याच्याशी वस्तू दाखवणे आणि आर्थिक व्यवहार करावा, असे आवाहन चाकण पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.