Chakan Crime News: ट्रक चालकाला मारहाण करून 32 टन लोखंड चोरल्याप्रकरणी सात जणांना अटक

सर्व आरोपी कार आणि रिक्षातून आले. त्यांनी ब्रिजेशकुमार आणि शिवनारायण या दोघांना हाताने मारहाण केली. त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी चिकटवली आणि त्यांना आरोपींच्या कारमध्ये बसवले.

एमपीसी न्यूज – मालवाहतूक ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी चिकटवून 32 टन लोखंड असलेला ट्रक चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.1) पहाटे पाच वाजताच्या सुमारास शिक्रापूर-तळेगाव रोडवर रासे परिसरात घडली. चाकण पोलिसांनी लोखंड चोरी करणा-या सात जणांना अटक केली आहे.

सतीश मारुती पाटील (वय 31, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), विशाल अरुण कांबळे (वय 30, रा. चिखली गावठाण), बळीराम सदाशिव आलदे (वय 22, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), पंकज गौतम वाघ (वय 22, रा. चिखली गावठाण), योगेश शहाजी डोकेफोडे (वय 18, रा. तळवडे), अशोक गणपत कांबळे (वय 25, रा. चिखली), मंगेश शिवाजी लोखंडे (वय 35, रा. चिखली गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी ब्रिजेशकुमार मोतीलाल विश्वकर्मा (वय 28, रा. कापसी, नागपूर. मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रिजेशकुमार मालवाहतूक ट्रक (एमएच 40 बीएल 9377) या मालवाहतूक ट्रकवर चालक म्हणून काम करतात. ब्रिजेशकुमार आणि त्यांचा क्लीनर शिवनारायण विश्वकर्मा असे दोघेजण जालना येथून ट्रकमध्ये लोखंड घेऊन तळेगाव येथे पोहोच करण्यासाठी निघाले.

त्यांचा ट्रक शिक्रापूर-तळेगाव रोडने जात असताना रासे परिसरात सर्व आरोपी कार आणि रिक्षातून आले. त्यांनी ब्रिजेशकुमार आणि शिवनारायण या दोघांना हाताने मारहाण केली. त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी चिकटवली आणि त्यांना आरोपींच्या कारमध्ये बसवले.

आरोपींनी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराचे एकूण 32 टन लोखंड आणि ट्रक असा एकूण 22 लाख 3 हजार 159 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने आरोपींना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.