Chakan News : ….म्हणून मी पोलिसांना काहीच सांगण्याच्या फंद्यात पडत नाही – आमदार दिलीपराव मोहिते पाटील

एमपीसी न्यूज – चुकीच्या माणसाचे मी कधीच समर्थन करत नाही. चुकीच्या कामासाठी कधीच पोलिसांना सांगत देखील नाही. मला कुणाचाही एजंट व्हायला आवडत नाही. पोलिसांना सांगायला गेलं तर पोलीस हो म्हणून ऐकतात आणि त्यांना हवं तेच करतात म्हणून मी त्यांना काही सांगण्याच्या फंद्यात पडत नाही. असे खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील बुधवारी (दि. 1) महाळुंगे पोलीस चौकी येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

महाळुंगे पोलीस चौकी येथे पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला कक्ष आणि आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आमदार दिलीपराव मोहिते पाटील म्हणाले, ‘मागील काही वर्षात चाकण, महाळुंगे परिसरात कारखानदारी सुरू झाली. त्यासोबत गुन्हेगारी टोळ्याही तयार झाल्या. त्यांचा बिमोड करण्यासाठी महाळुंगे पोलीस चौकी तयार केली. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी चौकी पाहिली आहे. पहिले आयुक्त पद्मनाभन यांनी या चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचा पाठपुरावा आताचे आयुक्त देखील घेत आहेत.

खेड मतदारसंघातून मी निवडून येणार असे वाटल्याने काहींनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पुढे त्याच लोकांनी अजित पवार यांच्याकडे जाऊन सांगितले की, आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही गुन्हे दाखल केले. चुकीच्या माणसाचे मी कधीच समर्थन करत नाही. चुकीच्या कामासाठी कधीच पोलिसांना सांगत देखील नाही. मला कुणाचाही एजंट व्हायला आवडत नाही. पोलीस खात्यातील काही लोकांमुळे पोलीस खाते बदनाम होत आहे. आयुक्तांनी वेष बदलून अशा पोलिसांचा शोध घ्यावा असा मिश्किल टोला देखील आमदार मोहिते पाटील यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना लगावला.

ज्यांनी जमिनी लाटल्या. ज्यांना जेलमध्ये पाठवायला हवे. त्यांना पोलीस संरक्षण देतात. अशा लोकांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. जातीचा आधार घेऊन काहींनी गरिबांच्या जमिनी लाटल्या आणि प्लॉटिंग करून विकून टाकल्या. मला भीती आणि भय नाही. मी फकीर माणूस आहे. माझ्या तालुक्यातल्या प्रश्नांसाठी मी लढतो. त्यासाठी प्रसंगी पोलीस ठाण्यासमोर बसण्याची देखील माझी तयारी असल्याचे आमदार म्हणाले.

काही कंपन्याच चुकीच्या लोकांना पोसतात
आमदार मोहिते पाटील म्हणाले, अनेक कंपन्यांमध्ये कामगारांची युनियन बनवू दिली जात नाही. त्यासाठी चुकीच्या लोकांना पोसण्याचे काम देखील कंपन्या करत आहेत. हे चुकीचे आहे. काही कंपन्यांचे एमडी बाहेरदेशात बसतात आणि कंपनीतील भंगार आणि अन्य बाबतीत ते चुकीच्या लोकांसोबत भागीदारी करून बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. भंगार कंत्राटदार असलेल्या एका व्यक्तीला कंपनीने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले. त्या माणसाने त्याचे नाव बदलले आणि तो तिथेच व्यवसाय करू लागला. काहीजण कंपन्यांना त्रास देतात पण त्याचे नेमके कारण शोधून काढणे गरजेचे आहे.

चाकण, महाळुंगे परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. चाकण परिसरात जगातील अनेक उद्योग येण्यासाठी तयार आहेत. त्यांना सुरक्षित वातावरण करून देणे गरजेचे आहे. पोलीस ते काम करत असतात. माझ्या कंपनीत माथाडी नको, संघटना नको, अशी भावना घेऊन काही कंपन्यांनी चुकीच्या लोकांना हाताशी धरले. त्यामुळे अनेक वाद वाढले. माथाडीचा कायदाच नको या मताचा मी आहे. पण कामगारांना सुरक्षितता पण मिळायला पाहिजे.

भविष्यात खेडला स्वतंत्र महापालिका आणि पोलीस आयुक्तालय करण्याचा मानस
भविष्यात महापालिका बनविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए द्वारे खेड तालुक्याचा आराखडा तयार केला जात आहे. चाकण हे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचा आमचा मानस आहे. त्याचे प्लॅनिंग देखील सुरू आहे. सुहास दिवसे यांच्यासोबत मिळून ते काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.