Chakan News : कंपन्यांवर दबाव टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – कंपन्यांवर दबाव टाकून, त्यांना वेठीस धरून टेंडर, कामे मिळवल्यास गय केली जाणार नाही. दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

चाकण एमआयडीसीतील कंपनी प्रतिनिधी आणि महाळुंगे पोलीस यांची संयुक्त बैठक आज (दि. 26) एआरएआय कंपनीत पार पडली. त्यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते. बैठकीसाठी सहाय्यक आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, एमआयडीसी परिसरात भयमुक्त वातावरण राहण्यासाठी पोलिसांकडून विशेष भर दिला जाईल. स्थानिक व्यक्तींनी कंपनीत काम मिळवण्यासाठी, कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्ट , ट्रान्सपोर्ट, टेंडर मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव टाकून धमकी देऊन काम करून घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक प्रतिनिधी यांनी स्वार्थी आणि मोजके हितसंबंध बघणा-या लोकांनी केलेली दिशाभूल वेळीच ओळखून त्यांना आवार घालावा. परिसरात आणखी कंपन्या सुरु होऊन रोजगार निर्मिती होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. कंपन्यांमध्ये होणा-या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपनीतील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवायला हवी. कंपनी परिसरात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे देखील गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार म्हणाले, “कंपन्यांमध्ये होणा-या चोरीच्या घटनांमध्ये अनेकवेळा कंपनीतील कामगार, सुपरवायझर यांचा सहभाग असल्याचे आढळून येते. त्यामुळे कंपनीत काम करणारे सुपरवायझर आणि कामगार यांचे पोलीस व्हेरिफिकेशन वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे. कंपनीत काम करणा-यांची संपूर्ण माहिती कंपनी प्रशासनाने अद्यायावत ठेवायला हवी.

कंपनीतील निर्जन ठिकाणे तपासून त्यांची वेळोवेळी तपासणी करावी. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन कंपन्यांनी करावे. पोलिसांच्या सूचनांकडे कानाडोळा केल्यास आणि भविष्यात कंपनीत चोरी सारखे प्रकार घडल्यास कंपनी प्रशासनावर देखील कारवाई केली जाईल, असेही पोलीस निरीक्षक पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.