Chakan : गोळीबारप्रकरणी नऊजण ताब्यात; पंधरा जणांवर गुन्हे दाखल

परिसरात दहशतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – चाकण (ता. खेड) येथील खंडोबामाळ भागात सराईत गुन्हेगारांच्या टोळीने एकावर फिल्मी स्टाइलने पाठलाग करून कोयत्याने हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.२७) रात्री सव्वा अकराचे सुमारास घडली. पाठलाग करणाऱ्या टोळीने एकावर कोयत्याने वार करीत तीन राउंड फायर केले. दोन गोळ्या अन्यत्र लागल्या तर, तिसरी गोळी पायात लागली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर मंगळवारी (दि.२८) पहाटे गुन्हे दाखल झाले आहेत. खंडोबामाळ येथे रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेत आहे. यातील तीन अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

संकेत रमेश गाडेकर (वय २०, रा. खंडोबा माळ, खंडेश्वर कॉलिनी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गोळीबार आणि कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • संकेत गाडेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोन्या अवताडे, सोन्या आगरकर,रोहन घोगरे, मोनेश घोगरे, प्रतिक सोनवणे, विवेक कु-हाडे, राहुल माने, रवि कळसकर, प्रशांत दातार (सर्व रा. चाकण, ता. खेड) आणि स्वप्निल ऊर्फ सोप्या शिंदे (रा. रासे, ता. खेड) आणि त्यांच्या सोबतचे आणखी पाच जण (नावे निष्पन्न नाहीत) अशा सुमारे पंधरा जणांवर खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्टसह (भारतीय शस्त्र कायदा) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री अकराचे सुमारास चाकण येथील खंडोबामाळ भागातील अबू बकर मशिदीच्या जवळ संकेत गाडेकर मित्रांच्या समवेत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी सोन्या अवताडे आणि त्याचे साथीदार अशा सुमारे पंधरा जणांनी आदल्या दिवशी रविवारी ( दि.२६) रात्री एका लग्नाच्या वरातीत झालेल्या कोयता हल्ल्याचा राग मनात ठेवून हातात काठया, कोयते आणि पिस्तुलासह संकेत यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आले. हल्लेखोरांना पाहताच संकेत याने अबू बकर मशिदीच्या गल्लीतून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित टोळीने पाठलाग सुरु केला.

  • संकेत यास मशिदीच्या शेजारी पकडून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करीत हातातील पिस्तुलाची गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यातील एक गोळी संकेत याच्या उजव्या पायाला लागली. डाव्या खांदयाला कोयता लागून गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.

संकेत यास तत्काळ पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी रात्रीच संशयितांचा पाठलाग सुरू केला असून पहाटे रवि कळसकर, प्रशांत दातार, रोहन घोगरे आणि आणखी काहींना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.