Chakan : चाकणमध्ये ‘नो आयडिया’ !

आयडिया ग्राहक आउट ऑफ रेंज ; सलग तिसऱ्या दिवशीही सेवा कोलमडलेलीच

अनेकांची कामे ठप्प ; निवडणुकीच्या धामधुमीत नेते कार्यकर्ते त्रस्त

एमपीसी न्यूज- चाकणमध्ये मागील काही दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच्या समस्येने वैतागलेल्या ग्राहकांना शुक्रवारी (दि.11) सलग दुसऱ्या दिवशी मोबाईलवरून कुणालाही संपर्क करणे अशक्य झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. बुधवारी (दि.10) पासून नागरिकांना फोन लावणे आणि इनकमिंग फोन येणेही अवघड झाल्याचा अनुभव येत आहे. बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून सुरु झालेला गोंधळ गुरुवारी आणि शुक्रवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा सुरळीत झालेला नाही. चाकण शहराच्या भागातील आयडीया सेल्युलर या खासगी कंपनीच्या ग्राहकांनाच याचा फटका बसल्याचे नागरिकांनी सांगितले. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या गोंधळामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांची कामे ठप्प झाली असून निवडणुकीच्या धामधुमीत नेते कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत.

फोन सुरू असताना अचानक कट होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर बुधवारी सकाळपासूनच सुरु झाले आहेत. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आयडियाचे ग्राहक असलेल्या अनेकांच्या मोबाईल मधून नेटवर्क गायब झाले. स्मार्ट फोन असलेल्या मोबाईल मध्ये नेटवर्क फोर-जी दाखवू लागले आणि फोन करण्यासाठीची साधी सुविधाही बंद पडली. तीन दिवसांपासून कित्येकदा प्रयत्न करूनही फोन न लागणे. अचानक लागल्यास लगेचच कॉल बंद होणे, एखादा कॉल झाल्यानंतर पुन्हा फोन न लागण्याचे प्रकार सुरु झाल्याने अनेकांनी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी विविध अन्य कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये धाव घेतली.

सध्या क्षणाक्षणाला मोबाइलशिवाय जगणे कठीण झालेले असताना अचानक मोठ्या प्रमाणावर सुरु झालेल्या या असुविधेने अनेकांची दैनंदिन कामे प्रभावित झाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुरु झालेल्या या असुविधेने नेते कार्यकर्तेही त्रस्त झाले आहेत. चाकणमध्ये आयडियाचे अधिक ग्राहक आहेत. मात्र याच आयडियाकडून मिळणाऱ्या या असुविधेने खूप त्रास होत असल्याने नागरिक सांगत आहेत.

दरम्यान, आयडिया सेल्यूलर कंपनीला मागील काही दिवसांत तोटयाचा सामना करावा लागला आहे. रिलायन्स जिओने सर्वच मोबाईल कंपन्याच्या ताळेबंदावर परिणाम केला आहे. या कारणामुळे आता आयडीया सेल्यूलर आणि व्होडाफोन या कंपन्या एकत्र येऊन काम करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गैरसोईने आयडिया या नागरिकांच्या पहिल्या पसंतीच्या कंपनीच्या ग्राहक संख्येवर मोठा परिणाम चाकण भागात होणार असल्याचे नागरिकांच्या तीव्र भावनांतून स्पष्ट होत आहे. शुक्रवारी अनेकांनी आपले जुने मोबाईल अन्य कंपन्यांमध्ये पोर्ट करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान स्मार्ट फोन नसलेल्या ग्राहकांना तुलनेने या असुविधेचा कमी फटका बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.