Chakan : आई-वडिलांचा परित्याग केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पैशांसाठी आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांचा परित्याग करून आधारहीन केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2004 पासून 23 मार्च 2020 या कालावधीत खराबवाडी गावठाण, चाकण येथे घडला आहे.

तेजस मधुकर वाडेकर, मेघा तेजस वाडेकर (दोघे रा. खराबवाडी गावठाण, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शोभा मधुकर वाडेकर (वय 60, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती ज्येष्ठ नागरिक आहेत. आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी आणि त्यांचे पती यांना पैशांसाठी हाताने मारहाण केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांना स्वतःच्या घरातून बाहेर हाकलून दिले. त्यांना घरात येण्यासाठी अटकाव करून घराचे कुलूप तोडून फिर्यादीचे योगेश वाडेकर, श्वेता वाडेकर, आरंभ वाडेकर यांचे कपडे, भांडी, फर्निचर, जमीन बँकेची मूळ कागदपत्रे इत्यादी सामानाची मोडतोड करून त्याचे नुकसान केले. फिर्यादी यांच्या मालकी हक्काच्या घरात अतिक्रमण करून त्या घरात आरोपी राहिले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांची देखरेख आणि सुरक्षा करणे हे कर्तव्य असताना देखील त्यांचा परित्याग करून त्यांना आधारहीन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.