Chakan : अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी खंडणी दरोडाविरोधी पथकाकडून एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

राहुल रामदास बांगर (वय 19, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस चाकण परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई आशिष बनकर आणि सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, चाकण येथील एचपी चौकात एक तरुण येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी राहुल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे 30 हजार 400 रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करत आरोपी राहुल याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, महेश खांडे, प्रवीण कांबळे, नितीन लोखंडे, आशिष बनकर, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.