Chakan : भरधाव ट्रकची दुचाकीस धडक ;एक ठार; एक गंभीर 

एमपीसी न्यूज – पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकची ठोस बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार; तर एक गंभीर जखमी  झाल्याची घटना चाकण ( ता. खेड) येथील तळेगाव चौकात शनिवारी (दि.5) दुपारी तीनचे सुमारास घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

श्रीरंग भगवंत कोळेकर ( वय 62 रा. थोपटवाडी, करंजविहीरे ता. खेड,जि. पुणे ) असे या घटनेत ठार झालेल्या दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर लालासाहेब शिवराम कोळेकर ( वय 64 , रा.  करंजविहीरे ता. खेड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बाबतचे अधिक वृत्त असे कि, श्रीरंग कोळेकर व लालासाहेब कोळेकर हे भोसे ( ता. खेड) येथे एका कार्यक्रमाच्या निमित गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा करंजविहीरे येथे दुचाकीवरून निघाले होते. शिक्रापूर बाजूकडून चाकण येथील तळेगाव चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीस  ( एम एच 14 जी यु 4056)  पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ( क्र.एम एच 14 जी यु 4056) जोरदार धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच श्रीरंग कोळेकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लालासाहेब कोळेकर यांच्यावर उपचार सुरु असून भरधाव ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

हाय-वे कि डाय – वे ?

वडगाव – तळेगाव -चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी, आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झाला आहे.  या रस्त्याचे गेली अनेक वर्ष लालफितीत अडकलेले काम सुरू करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर पादचारी , दुचाकीस्वार चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी,आणि मावळ तालुक्याच्या हद्दीत सुदुंबरे जवळ धोकादायक असलेल्या सुधा नदीवरील पुलावरून अवजड वाहने कंटेनर थेट नदी पत्रात कोसळणे, असे प्रकार सातत्याने होत असतात. त्यामुळे हा महामार्ग प्रवासाचा हायवे नव्हे तर मृत्यूचा डाय वे असल्याची नागरिकांची भावना झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.