BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाळीस तक्रारदारांचा मुद्देमाल परत ; चाकण पोलीस ठाण्यातील उपक्रम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार यात चोरी गेलेला मुद्देमाल चाकण (ता. खेड) पोलिसांनी तपास करुन मिळवला. हा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून बुधवारी (दि.13) परत करण्यात आला. चाकण मधील या कार्यक्रमात लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला; यात सुमारे 40 तक्रारींमधील 28 दुचाकी, 1 चार चाकी मोटार, अनेक महागड्या वस्तू, 11 मोबाईल आदींचा समावेश होता.

मागील सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश झालेल्या चाकण पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमातून परत करण्याचा उपक्रम आयुक्तालयाने हाती घेतला आहे. चाकण मधील या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चाकण पोलीस ठाण्यांमधील घरफोडी, चोरी, लूटमार यासारख्या ४० गुन्ह्यांमधील हा लाखो रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला.

नागरिकांनीही दक्षता घ्यावी- स्मार्तना पाटील ( पोलीस उपायुक्त)

अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती कसलाच सुगावा नसतो. यावेळी तपास करणे कसरतीचे ठरते. मात्र, मेहनत, जिद्द व कौशल्याच्या बळावर चाकण पोलिसांनी ते सहज शक्य केले आहे. यापुढेही प्रत्येक गुन्हा उघड करुन मुद्देमाल फिर्यादींना परत केला जाईल. महागडी वाहने वापरताना त्यांच्या लॉकिंग सिस्टीमकडे नागरिकांनी लक्ष दिल्यास वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

तीन हजार गुन्ह्यांचा निपटारा: सुनील पवार (वरिष्ठ पो.निरीक्षक)

चाकण पोलीस ठाण्याचा समावेश आयुक्तालयात होताना तब्बल 2 हजार 500 गुन्हे प्रलंबित होते. मागील सहा महिन्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले आहेत. अशा चार हजार गुन्ह्यांपैकी सुमारे साडेतीन हजार गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला आहे. पुढील काळात उर्वरित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. या भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यात पोलिसांना यश आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.