Chakan : एटीएम फोडण्याचा प्रयत्न चाकण पोलिसांनी उधळला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – चाकण येथील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा प्रयत्न चाकण पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले असता पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले आहे. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास चाकण जवळ कुरुळी गावात पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या ऍक्सिस बँकेच्या एटीएम समोर घडली.

चेतन शिवाजी राऊत (वय 25, रा. बलुतआळी, चाकण, ता. खेड), गणेश प्रकाश नाईक (वय 20, रा. भुजबळ आळी, चाकण, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ऍक्सिस बँकेचे अधिकारी विनायक तुकाराम केंजळे (वय 28, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस रात्री चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. कुरुळी गावात पुणे-नाशिक महामार्गावर ऍक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्या एटीएममध्ये काही तरुण संशयित हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी एटीएम समोर गाडी नेली असता काहीजण एटीएम मधून बाहेर पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दोघांना पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकी (एम एच 14 / डी व्ही 0349) जप्त करण्यात आली असून ती दुचाकी देखील चोरीचे असल्याचे उघडकीस आले आहे.

एटीएम मध्ये एमटीएम फोडण्यासाठी पहार आढळली. चोरटयांनी एटीएम मधील कॅमे-यांमध्ये चोरीचा प्रकार कैद होऊ नये, यासाठी स्प्रे मारला होता. घटना घडताना एटीएम मशीनमध्ये एकूण 27 लाख रुपये रोख रक्कम होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांना अटक केली असून त्यांचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.