Chakan : प्रकाश वाडेकर यांचा तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा; खेड शिवसेनेत खळबळ

शिरूरमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि जिल्हा प्रमुखांकडे दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुकाप्रमुख राजीनामा देत असल्याने खुद्द माजी खासदार आढळराव-पाटील यांचे अत्यंत निकटचे मानले जाणारे जिल्हाप्रमुख राजीनामा देणार काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना खेड तालुक्‍यातून मताधिक्‍य न मिळाता राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्‍य मिळाल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख या नात्याने जबाबदारी स्वीकारत वाडेकर यांनी राजीनामा दिला आहे.

  • शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वास्तविक खेडमध्ये राष्ट्रवादीला अवघे ७ हजारांचे अत्यंत कमी मताधिक्य होते. तरीही वाडेकर यांच्या राजीनाम्याने पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी पुढील काळातही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत नुकतेच दैनिक पुढारी मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

याबाबत प्रकाश वाडेकर यांनी सांगितले कि, पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव झाला. लोकांनी अभिनेत्याला संधी दिली. आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्री मंडळामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली असती. परंतु राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने ही मंत्री पदाची संधीही हुकली आहे. १५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला पूर्वीचा खेड आणि नंतरचा शिरूर मतदारसंघ हातातून निसटला आहे. याबाबतची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. चार वर्षे तालुकाप्रमुख म्हणून काम केल्या नंतर यापुढे एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षात काम करणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.