Chakan : कर्जाच्या दुप्पट रक्कम व 13 एकर जमीन लाटणाऱ्या खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- व्याजाच्या रकमेपोटी दुप्पट रक्कम वसूल करून शिवीगाळ, दमदाटी करून, तेरा एकर जमीनही जबरदस्तीने खरेदीखत करून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी बुधवारी ( दि. 13 ) रात्री उशिरा खराडी ( पुणे ) येथील दोन बड्या खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

नंदा प्रताप खांडेभराड ( वय – रा. कडाची वाडी, ता. खेड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादी वरून चाकण पोलिसांनी धीरज धनाजी पठारे व उमेश उर्फ दादा खंडू खांदवे ( दोघेही रा. खराडी, पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी व त्यांचे पती प्रताप खांडेभराड यांना 10 टक्के व्याज दराने दिलेले 1 कोटी 20 लाख रुपयांचे 12 लाख रुपये प्रती महिना या प्रमाणे 15 महिने व्याजापोटी 1 कोटी 80 लाख व त्यानंतर ३१ लाख रुपये असे 2 कोटी 11 लाख रुपये व्याज वरील दोघांनी जबरदस्तीने घेतले. रांजणगाव, ढोक सांगवी येथील 13 एकर जमीन धमकावून खरेदीखत करून घेतले.

त्याचप्रमाणे वरील दोघांनी वेळोवेळी खांडेभराड यांना चाकण येथील घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करून व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. खांडेभराड यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी वरील दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 2014 नुसार, 31,32, 44,45 त्याच प्रमाणे अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.