BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : घर मालकांनो सावधान ; भाडेकरूंची माहिती द्या 

वीस घरमालकांवर गुन्हे दाखल  ; चाकण पोलिसांची कारवाई  

2,831
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात भाड्याने राहत असलेल्या राज्यातील , परराज्यातील , देशी, परदेशी लोकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असावी, म्हणून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे चाकण पोलिसांकडून बंधनकारक करण्यात आले आहे. चाकण पोलिसांनी चाकण शहर आणि लगतच्या खराबवाडी ,महाळुंगे ,नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी, निघोजे परिसरातील वीस घरमालकांवर भा.दं. वि. 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षे भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकांची चांगलीच पळापळ सुरु झाली आहे.  
.

स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेला दहशतवादी मागील महिन्यात चाकण हद्दीत मुंबई एटीएसने पकडला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक जागरूक झाली आहे.  औद्योगीकारणाने आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंखेच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याकाठी हजारो – लाखो रुपये पदरात पाडून घेणाऱ्या घरमालकांनी अनेकदा विनंती करूनही पोलिसांकडे भाडेकरूंची माहिती दिलेली नाही. त्यामुळे भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर चाकण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चाकण परिसरात असामाजिक प्रवृत्तींना काही घरमालकांकडून  न कळत थारा  दिल्याची शक्यता असून आपल्याकडील भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी, यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणारे घरमालक आणि संबंधित असलेल्या सर्वांवर आयपीसी 188 गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
 
वीस जणांवर गुन्हे दाखल : 
 एकनाथ शेळके ( चिखली), कमलेश भोसले ( महाळुंगे), बाळासाहेब येळवंडे ( निघोजे), संदीप खराबी ( खराबवाडी) , विशाल कांडगे ( मार्केट यार्ड, चाकण), सचिन क्षीरसागर ( बलुत आळी, चाकण) , संदीप क्षीरसागर ( धाडगे आळी, चाकण), श्रीराम विश्वकर्मा ( बलुतआळी , चाकण) , पप्पू बघेल ( बलुतआळी , चाकण), तुषार खराबी ( खराबवाडी), संतोष नाणेकर ( नाणेकरवाडी), रामचंद्र भोर ( अवसरी, आंबेगाव), अतुल गोरे ( मेदनकरवाडी) , रुपेश जाधव ( नाणेकरवाडी) , संदीप जाधव ( नाणेकरवाडी), नितीन घोजगे ( बुधवार पेठ, पुणे), सुदाम घोजगे ( सुदुंबरे, मावळ) , कैलास बवले ( महाळुंगे), नितीन सरोदे ( पिंपरी, पुणे), भीमा पायगुडे ( महाळुंगे) या वीस जणांवर आयपीसी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
हॉटेल , कंपन्या , सोसायट्याही रडारवर : 
 पोलिसांच्या भितीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी जाणेही अनेक खोल्यांचे मालक  टाळतात. चाकण भागातील अनेक बड्या हॉटेल्स मध्ये पदेशी  व्यक्ती वास्तव्य करतात. एमआयडीसी मध्ये कामाच्या निमित्ताने परदेशी व्यक्ती नेहमी येत असतात. त्यांचीही माहिती संबंधित कंपन्या आणि हॉटेल्स मधून देणे बंधनकारक आहे. चाकण परिसरातील अनेक उच्चभू सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या सुशिक्षितांनाही पोलिसांच्या या नियमाची माहिती नसल्याने भाडेकरूंची माहिती देण्यात येत नसल्याचे  दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वच कारवाईच्या कात्रीत येणार आहेत. 
 
स्वतःहून माहिती द्यावी : सुनील पवार ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चाकण ) 
 चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. अद्यापही लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली जबाबदारी ओळखून पोलिसांपर्यंत माहिती पोहचविणे आवश्यक असल्याचे चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले. 
.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: