Chakan : मराठा आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको पुणे नाशिक महामार्ग तासभर रोखला

मंत्र्यांच्या नावे शिव्यांची लाखोली

एमपीसी न्यूज –  मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 16 ) पुणे नाशिक महामार्गावर (Chakan) भाम फाटा (ता.खेड ) येथे  ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह अंतरवाली सराटी (जालना) येथील आंदोलनाला पाठिंबा व मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तासभर पुणे नाशिक महामार्ग रोखण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संतप्त मराठा आंदोलकांनी अक्षरशः सरकार आणि काही मंत्र्यांच्या नावे शिव्यांची लाखोली वाहिली.

Pimpri : सोसायटीधारकांच्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक

शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते पुणे नाशिक महामार्गावर बसले.  या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दुपारी पावणेबारा ते साडेबारा असे सुमारे पाऊन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परिसरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी आंदोलनस्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

या वेळी मनोगते व्यक्त करताना मराठा आंदोलकांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण सरकारने देण्याची मागणी केली. खेड तालुक्यात साखळी उपोषणाच्या माध्यमातून हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला आरक्षण (Chakan) मिळेपर्यंत ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचा निर्धारही विविध वक्त्यांनी व्यक्त केला. त्यासोबतच अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला.

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे मनोहर वाडेकर, अतुल देशमुख, अनिलबाबा राक्षे, बाबाजी काळे, ह.भ.प. सुप्रिया ठाकूर, क्रांती गारगोटे, शांताराम भोसले, भगवान मेदनकर, अंकुश राक्षे, निलेश कड पा. , राहुल नायकवाडी, पप्पू टोपे, सुरज टोपे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. चाकणचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलन स्थळी होता.

 

दरम्यान मराठा आरक्षणाच्या बाबत शासन ठोस निर्णय घेणार नाही तो पर्यंत खेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कार्यकर्ते आक्रमक :
बराच वेळ महामार्ग रोखण्यात आल्याने पोलिसांनी आंदोलनाच्या आयोजकांना लवकर महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली. त्यावेळी काही कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर देखील काही कार्यकर्ते रस्त्यातच काही वेळ बसून होते. पोलिसांच्या आग्रही विनंती नंतर हे कार्यकर्ते महामार्गावरून बाजूला झाले.

…त्यांनी राजीनामे द्यावेत : मनोहर वाडेकर
मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण, अजूनपर्यंत त्याला यश आले नाही.  सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा लढा तीव्र करावा, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी मांडली. गेल्या पाच वर्षांत सत्तेत सर्वच पक्ष सामील झाले; फोडाफोडीच्या राजकारणात शासनाला स्वारस्य आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या बाबत गांभीर्य नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीमाने द्यावेत अशी मागणी वाडेकर यांनी यावेळी केली. त्यास उपस्थित आंदोलकांनी जोरदार पाठींबा (Chakan) दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.