Chakan : माजी नगरसेविकेवर बलात्कार प्रकरणी नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

एमपीसी न्यूज- एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एमआयएममधून हकालपट्टी झालेला औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेत अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीच्या ठरावाला विरोध केल्यानंतर शिवसेना भाजप नगरसेवकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. आता बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सय्यद मतीन याचे नाव पुन्हा नाव चर्चेत आले आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नगरसेवक मतीन रशीद सय्यद, मतीनचा मेहुणा हामेद सिद्धिकी आणि मतीनचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद (सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा सर्व प्रकार 26 नोव्हेंम्बर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या दरम्यानच्या महिन्यात घडला आहे. पीडित महिला ही माजी नगरसेविका आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि मतीन एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा आरोपींनी गैरफायदा घेतला. आरोपींनी पीडित महिलेची आई आजारी असल्याचे कारण सांगून तिला खंडाळा येथील वॉटर पार्क, कृष्णसागर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद, औरंगाबाद-शरणापूर फाटाजवळील गिरीजा हॉटेल लॉजवर आणि औरंगाबाद हर्सूल येथे एका घरामध्ये नेऊन बलात्कार केला. तसेच महिलेला गुंगीचे औषध दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी पीडित महिलेच्या को-या कागदावर सह्या घेतल्या. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

मतीन सय्यद एमआयएम पक्षाच्या तिकिटावर औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आला होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनांतर औरंगाबाद महापालिकेत श्रद्धांजली ठरावास नगरसेवक मतीन सय्यद याने विरोध केला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर एमआयएम पक्षाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. यापूर्वी देखील मतीन याच्यावर एक गुन्हा दाखल असून तो सध्या औरंगाबाद कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर आता पुन्हा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.